त्र्यंबकेश्वर : शहर व परिसरात २ जुलैपासून सुरू असलेल्या पावसात सातत्य दिसून येत आहे. सरासरी कमी असली तरी पावसाची हजेरी मात्र दररोज दिसून येत आहे. १० जुलै- १०५, ११ जुलै- २०८, १२ जुलै- ८९ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, आकडेवारीनुसार सरासरीत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. तथापि, १३ जुलै ते २३ जुलैदरम्यान पावसात सातत्य दिसून आले. आतापर्यंत (२२ जुलै) त्र्यंबकला ८५३ मि.मी. पावसाची नोंद झाली. जुलै महिन्यात ७५६ मिमी पावसाची नोंद झाली आहे.शहरीकरणाच्या हव्यासापायी सीमेंटची जंगले वाढत असून, यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे. यामुळे पावसाचे प्रमाण कमी होत चालले आहे. यातून पिण्याच्या पाण्याचा तुटवडा जाणवू लागला. या परिस्थितीतून सुटका होण्यासाठी राज्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणाची मोहीम हाती घेण्यात आली. दोन कोटी रोपांची लागवड करण्यात आली. वृक्षारोपणाची मोहीम त्र्यंबकलादेखील मोठ्या प्रमाणात राबविण्यात आली.त्र्यंबकला पावसाचे सातत्य असल्याने निसर्गाच्या सान्निध्यात धबधब्याखाली स्नान करण्यासाठी व निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची व निसर्गप्रेमींची त्र्यंबक परिसरात गर्दी होत आहे. शनिवार, रविवार अथवा सुटीच्या दिवशी पहिणे किंवा त्याहीपुढे दुगारवाडी आदि निसर्गरम्य परिसरात टूव्हीलर, फोर व्हीलरने निसर्गप्रेमी परिसरात येत आहेत. मात्र शनिवार (दि. २३) पासून पेगलवाडी फाटा, दुगारवाडी भागात पोलिसांनी बॅरिकेडिंग लावून वाहनांची तपासणी माहीम हाती घेतली आहे. तपासणी करूनच वाहन पुढे सोडले जात आहे. यामुळे नवतरुणाईला बऱ्याच प्रमाणात चाप बसणार आहे, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक हेमंत बेंगळे व किरण मेहरे यांनी दिली. रविवारी पावसाने उघडीप दिली आहे. परिसरात शेतीच्या कामांचा वेग आला आहे. (वार्ताहर)
संततधार असूनही सरासरीत घट
By admin | Updated: July 24, 2016 23:12 IST