कळवण : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारांची संख्या अधिक झाल्याने दुरंगीसह तिरंगी, चौरंगी, पंचरंगी, षष्ठरंगी लढती झाल्या. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत तालुक्यातून अनेक उमेदवारांनी रणांगणात उडी घेतली. मात्र मैदानात दोन हात करताना ४८ पैकी २५ उमेदवारांवर अनामत रक्कम जप्त होण्याची नामुष्की ओढावली. त्यात खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे सुपुत्र कनाशी गटातील भाजपाचे उमेदवार समीर चव्हाण यांच्यासह जयमाला खांडवी व हिराजी चौधरी या दोघा माजी जिल्हा परिषद सदस्यांचा समावेश आहे.माकपाच्या ८, भाजपा- ३, शिवसेनेच्या ४ तर १० अपक्षांना अनामत गमवावी लागली आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या ७ जागांवर निवडणूक लढविणाऱ्या कॉँग्रेसच्या एकाही उमेदवाराचा यात समावेश नाही, तर राष्ट्रवादी कॉँग्रेसने जि.प. व पं. स.च्या लढविलेल्या सर्व जागा जिंकून कळवण तालुक्यात कळवण कृषी उत्पन्न बाजार समिती, कळवण नगर पंचायतीनंतर जि.प. व पं.स.मध्ये विजयाची परंपरा कायम ठेवून जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार यांनी तालुक्यात राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या विजयाचा सिलसिला कायम ठेवत आपले वर्चस्व अबाधित ठेवले आहे. अनुसूचित जमातीसाठी साडेतीनशे, तर सर्वसाधारण व नागरिकांचा मागास प्रवर्गसाठी पाचशे रुपये अनामत रक्कम होती. त्यात नरूळ व बापखेडा गणातील चार उमेदवार दोन हजार, अनुसूचित जमाती गणातील १५ उमेदवारांचे ५ हजार २५० रुपये, तर पंचायत समितीच्या १९ उमेदवारांचे ७ हजार २५० रुपये शासनाकडे जमा झाले आहेत. जिल्हा परिषदेच्या ६ व पंचायत समितीच्या १९ अशा एकूण २५ उमेदवारांचे १० हजार २५० रुपये शासनाच्या तिजोरीत पडून महसुलात वाढ झाली आहे.कळवण पंचायत समितीच्या खर्डेदिगर गणातील सोमनाथ चौरे ( शिवसेना), सुनील पवार (माकपा), रामदास ठाकरे (अपक्ष), मोकभणगी गण- विक्र म पवार (माकपा), अनिल सोनवणे (अपक्ष), निवाणे गण- उज्ज्वला पवार (शिवसेना), अलका वाघ (भाजपा), उषाबाई पवार (अपक्ष), मानूर गण- कासूबाई माळी (माकप), बापखेडा गण- मनोज बोरसे (भाजपा), भरत शिंदे (माकपा), कनाशी गण- पुष्पा चव्हाण (माकपा), इंदिरा पवार (अपक्ष), अनुसया बागुल (अपक्ष), अभोणा गण- विलास गवळी ( माकपा), चंद्रकला बहिरम (अपक्ष), प्रमोद ठाकरे (अपक्ष), नरु ळ गण- प्रीती मेणे (शिवसेना), सुमन पवार (अपक्ष)यांची अनामत जप्त झाली. निवडणुकीत अपेक्षित मते न मिळाल्यास उमेदवाराची अनामत जप्त करण्यात येऊन त्याला पुढील निवडणुकीत परिणामांना सामोरे जावे लागते. माकपा,भाजपा व शिवसेनेच्या उमेदवारांवर अनामत जप्तीची नामुष्की ओढावल्याने तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे. (वार्ताहर)
२५ उमेदवारांची अनामत जप्त
By admin | Updated: March 2, 2017 00:31 IST