देवळा : ग्रामीण भागातील वाड्या-वस्त्यांवरील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा हक्काचे व्यासपीठ आहे. स्पर्धेच्या निमित्ताने तळागाळातील हिरे शोधून त्यांना पैलू पाडण्याचे आदर्श काम शिक्षकांनी करावे, असे आवाहन देवळा पंचायत समितीचे सभापती केदा शिरसाठ यांनी केले. देवळा तालुकास्तरीय जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. देवळा तालुकास्तरीय जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धांचे जिल्हा परिषद विद्यानिकेतन शाळेत शुक्रवारी (दि. २२) पंचायत समितीचे सभापती शिरसाठ यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपसभापती सिंधू पवार, पंचायत समिती सदस्य अशोक बोरसे, गटविकास अधिकारी सी. एल. पवार, गटशिक्षणाधिकारी शोभा पारधी, विद्यानिकेतनचे मुख्याध्यापक सतीश बच्छाव, शिक्षणविस्तार अधिकारी अशोक गोसावी, विजया फलके यांच्यासह केंद्रप्रमुख उपस्थित होते. गटशिक्षणाधिकारी शोभा पारधी यांनी प्रस्ताविक केले. यशस्वी प्रत्येक विद्यार्थ्यास व शाळांना पंचायत समितीचे सभापती केदा शिरसाठ, उपसभापती सिंधू पवार, गटशिक्षणाधिकारी शोभा पारधी, सतीश बच्छाव, अशोक गोसावी आदि मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
देवळा तालुकास्तरीय जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा
By admin | Updated: January 24, 2016 23:59 IST