पंचवटी : परिसरात डेंग्यूसदृश आजारात वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पंचवटीत डेंग्यूसदृश आजाराने डोके वर काढले असले तरी मनपाच्या संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाले असून, महापौर अशोक मुर्तडक यांच्या प्रभागातील रामवाडी परिसरातच दोघा बालकांना डेंग्यूसदृश आजाराची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे. रुद्र मिलिंद कोल्हे-पाटील (५) व वीरा मिलिंद कोल्हे-पाटील (८ महिने) असे लागण झालेल्या दोघा सख्ख्या भाऊ-बहिणींची नावे असून, दोघेही रामवाडी परिसरात राहतात. महापौरांचा प्रभाग असलेल्या या रामवाडीत दोघा बालकांना डेंग्यूसदृश आजाराची लागण झालेली असली तरी याबाबत मनपा प्रशासन अनभिज्ञ असल्याने आश्चर्य व्यक्तकेले जात आहे. डेंग्यूसदृश आजाराची लागण झालेल्या या दोघा बालकांना एका खाजगी रुग्णालयात औषधोपचारासाठी दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. पंचवटी परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढला असला तरी संबंधित विभागाकडून कोणतीही विशेष दखल घेतली जात नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. काही दिवसांपूर्वीदेखील पंचवटीत डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण आढळले होते, त्यानंतर खडबडून जागे झालेल्या संबंधित विभागाने परिसरात तत्काळ स्वच्छता मोहीम राबविली होती. डेंग्यूसदृश आजारापासून बचाव करण्यासाठी प्रशासनाकडून वेळोवेळी जनजागृती केली जाते, मात्र ही जनजागृती केवळ कागदावरच राहत असल्याने प्रशासन आता तरी दखल घेणार का? असा सवाल संतप्त नागरिकांनी केला आहे. (वार्ताहर)
महापौरांच्या प्रभागात दोघा बालकांना डेंग्यूची लागण
By admin | Updated: October 24, 2015 00:19 IST