नाशिक : राज्य सरकारने शिक्षणावर खर्च करण्याऐवजी आमदारांचे वेतन व पेन्शन वाढीचा घेतलेला निर्णय मागे घ्यावा, या मागणीसाठी छात्रभारतीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यात सध्याची शैक्षणिक परिस्थितीचा विचार करता, शासनाने मुलींवर होणाऱ्या अत्याचारा संदर्भात कायदा करण्याची गरज असताना त्याकडे दुर्लक्ष करून आमदारांच्या पगारवाढीचा निर्णय घेतला, शिक्षणावर खर्च करण्यास पैशांचे कारण देणारे सरकार आमदारांवर खर्च करते, ते पाहता आमदारांची पगारवाढ त्वरित रद्द करावी, शिक्षणावरील खर्च सहा टक्केकरावा, स्थगित शिष्यवृत्ती सुरू कराव्यात, इबीसी सवलत प्राप्त विद्यार्थ्यांना ईबीसी सवलतीचा परतावा द्यावा, मुलींना बारावीपर्यंत मोफत शिक्षणाची अंमलबजावणी व्हावी, केजी ते पीजे सक्तीचे व सकस शिक्षण द्यावे, नाशिक शहरातील सोळा महाविद्यालयांनी घेतलेल्या अतिरिक्त शुल्काबाबत शिक्षण अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करावी आदि मागण्या करण्यात आल्या आहेत. या आंदोलनात सागर निकम, राकेश पवार, विशाल रणमाळे, मंगेश साबळे, दीपक देवरे, मुन्ना पवार, वैभव गुंजाळ, कोमल गांगुर्डे, रोशन पोलादे आदि सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
आमदारांच्या पगारवाढीविरुद्ध निदर्शने
By admin | Updated: August 12, 2016 23:19 IST