नाशिक : शहर बस वाहतूक करणाºया चालक-वाहकांनी एकत्र येत काम बंद आंदोलन करत प्रशासनाला धारेवर धरले होते. अखेर प्रशासनाने संतप्त कर्मचाºयांच्या सात मागण्या मान्य केल्यामुळे कर्मचाºयांना दिलासा मिळाला आहे. ज्या चालक-वाहकांच्या बळावर शहरात बसेस धावत आहेत त्यांच्याच सुरक्षिततेचा अन् रोजगाराचा प्रश्न गंभीर बनल्यामुळे मंगळवारी (दि.२२) त्यांच्या संतापाचा उद्रेक झाला. परिणामी दुपारपासून आगारामधून एकही बस रस्त्यावर आली नाही. त्याचा थेट फटका दररोज बसने प्रवास करणाºया पासधारक शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना व अन्य प्रवाशांना बसला. दुपारपासून ठप्प झालेली बससेवा संध्याकाळी उशिरापर्यंत सुरू झाली नव्हती. अधिकाºयांनी मागण्या मान्य केल्यानंतर रात्री आठ वाजेनंतर शहर बस वाहतुकीची चाके फिरली. शहर बस तोट्यात असल्याचे कारण दाखवून एकूण २०८ पैकी केवळ ८० बसेस रस्त्यावर धावत आहेत. ८० बसेसची महामंडळाच्या विभाग नियंत्रकांनी स्वनिर्णयाने कपात केली आहे. तसेच २५ ते ३० बसेस नादुरुस्त असल्यामुळे महामंडळाच्या गॅरेजमध्ये दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असतात. गॅरेजमध्ये मात्र मनुष्यबळ अपुरे असल्यामुळे बसेसची दुरुस्ती वेळेवर होत नाही, असा आरोप चालक-वाहकांनी केला होता. यामुळे बसअभावी चालक-वाहकांना त्या दिवसाच्या पगारावर पाणी सोडावे लागत होते. प्रशासनाने या समस्येवर तोडगा काढला असून बस न मिळाल्यास त्या दिवसाचा पगार कापला जाणार नाही.टप्प्याटप्प्याने शहर बस वाहतुकीत दुसºया विभागाकडून एकूण २५ ते ३० बसेस वाढविल्या जातील. ‘आरटीएस’ला दररोज ड्यूटीची नोंद करण्यात येईल, हेतुपुरस्सर नियमबाह्य कारवाईचा बळी कोणताही चालक-वाहक ठरणार नाही. बसचे ब्रेक नादुरुस्त झाल्यास नियमित वेळेच्या पुढे बस फेºया मारण्याची सक्ती केली जाणार नाही, असे लेखी आश्वासनाचे प्रगटन विभाग नियंत्रक, आगार व्यवस्थापक, कर्मचारी व्यवस्थापकांनी स्वाक्षरीसह जाहीर केले. यानंतर कर्मचाºयांनी संप मागे घेतला. बुधवारी (दि.२३) दिवसभर शहर बस वाहतूक सुरळीत होती.
बस चालक-वाहकांच्या मागण्या मान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 00:21 IST