नाशिक : आडगाव ते जानोरी रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. अनेक वर्षांपासून रस्त्याचे रुंदीकरण न झाल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
रुंदीकरणाअभावी कच्चे रस्ते असल्याने अपघातांना आमंत्रण मिळत आहे. रस्त्यावर पडलेल्या खड्डयांमुळे वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागते. ज्येष्ठ नागरिकांना चालताना मोठी गैरसोय सहन करावी लागत आहे.
आडगाव - जानोरी रस्त्यावर म्हाडाच्या चारशे अठ्ठेचाळीस घरांच्या भल्या मोठ्या इमारतीसह समाजकल्याण विभागाचे वसतिगृह, माध्यमिक शिक्षण विभागाचे कार्यालय व रयत शिक्षण संस्थेची शाळा असल्याने येथे नागरिकांची नेहमीच वर्दळ असते. मानवी वस्ती वाढल्याने येथील जुन्या अरुंद डांबरी रस्त्यांवरून प्रवास करताना नागरिकांची दमछाक होते. शिवाय अर्धा रस्ता कच्चा व अर्धा डांबरीकरण केलेला असल्याने अनेकदा वाहनधारकांचा तोल जाऊन अपघातांना निमंत्रण मिळते. अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या आडगाव - जानोरी रस्त्याचे रुंदीकरण करून सर्व खड्डे त्वरित बुजवावेत, अशी नागरिकांनी मागणी केली आहे. (फोटो १६ आडगाव)
कोट
साधारणतः सहा ते सात वर्षांपूर्वी आडगाव-जानोरी रस्त्याचे डांबरीकरण केलेले आहे. त्यानंतर प्रशासनाने अनेकदा केवळ कागदी घोडे नाचवीत फक्त सर्व्हे केला. परंतु कधीच या रस्त्याकडे लक्ष दिले नाही. पूर्वी नागरी वस्ती कमी असल्याने नागरिकांना अडचण कमी व्हायची. परंतु आता या मार्गावर मोठ्या प्रमाणावर नागरी वस्ती असल्याने सदर रस्त्याचे त्वरित रुंदीकरण करावे अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन उभारण्यात येईल.
- सुनील जाधव , शिवसेना उपमहानगर प्रमुख