नाशिक : अंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्यसेविका एम. एन. नाडेकर यांच्यामुळे संबंधित आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्याला आत्महत्त्या करण्याची वेळ येणार असून त्याबाबत वेळीच कार्यवाही करण्यात यावी, या मागणीचे निवेदन अंबोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रकाश वडजे यांना दिले.निवेदनात म्हटले आहे की, अंबोली (त्र्यंबकेश्वर) येथील आरोग्यसेवक सुरेश भवर यांच्या विरोधात श्रीमती नाडेकर यांनी विनयभंग करणे, जातिवाचक बोलणे व कार्यक्षेत्रात अप्रचार करणे तसेच मोबाइलद्वारे चित्रीकरण करणे हे सर्व खोटे आरोप केले आहे. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यास पोलिसांचा जाच सुरू झाला असून आरोग्यसेवक सुरेश भवर यांची मानसिकता खराब झाली आहे. संबंधित कर्मचाऱ्याचे मानसिक संतुलन ढासळले असून कर्मचारी जिवाचे बरेवाईट करण्याच्या तयारीत आहे.नाडेकर या जे काही चुकीचे काम करीत होत्या, त्यास भवर यांनी प्रतिबंध केल्यानेच त्यांच्या विरोधात नाडेकर यांनी या खोट्या तक्रारी दिलेल्या आहे. भवर यांच्या बाजूने अंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी व गावकरी आहेत. त्यामुळे नाडेकर यांच्यावर कार्यवाही करून त्यांची अन्यत्र बदली करावी,अशी मागणी आरोग्य कर्मचारी के. एस. अहिरे, डी. एस. गायकवाड, के.बी. बागुल, आय. के. गोडे, एम. एस. परदेशी, एल. बी. पवार, ए.डी.जाधव, एम.एस.शिंदे, एल, एल, सौंदाणे, ए.एस. खैरनार, ए. आर. चव्हाण, डी.आर. सोमवंशी, एम. आर. पाटील, एस.जे. गायकवाड, पी. पी. अपसुंदे, ए.एस. महाले, आर.आर. केदारे, आर.के. बोजगे आदिंंनी केली आहे. (प्रतिनिधी)
आरोग्यसेविकेवर कारवाई करण्याची मागणी
By admin | Updated: September 22, 2015 23:50 IST