संपूर्ण जगासह देशात, राज्यात तसेच मालेगाव शहर व तालुक्यात कोरोना महामारीने थैमान घातले आहे. मालेगाव शहरातसुद्धा कोरोना महामारीमुळे मृतांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. मालेगाव महापालिका हद्दीतील सर्वच स्मशानभूमीमध्ये अंत्यविधीसाठी कमी-अधिक प्रमाणात उशीर होत असल्याने मयतांच्या नातेवाइकांसह जनतेमध्ये भीतीचे व संतापाचे वातावरण निर्माण होत आहे. अंत्यविधीसाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात लाकडांची आवश्यकता भासत आहे. या लाकडांसाठी मोठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तल होऊन पर्यावरणासही हानी पोहोचत असून, मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. अंत्यविधीसाठी लागणाऱ्या लाकडांसाठी जनतेवर मोठ्या प्रमाणात आर्थिक भार पडत आहे. त्यामुळे येथील प्रत्येक स्मशानभूमीत विद्युत शवदाहिनी बसविण्यात याव्यात. त्यामुळे पर्यावरण रक्षण होईल व अंत्यविधीसाठीच्या वेळेतही बचत होऊन जनतेच्या भावनांचीही जोपासना होणार आहे. याबाबत सकारात्मक विचार करून मालेगाव महापालिका क्षेत्रातील सर्वच हिंदू स्मशानभूमिंमध्ये विद्युत दाहिनी बसविण्यात याव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
विद्युत शवदाहिनी सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:17 IST