नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यात साधू-महंतांना प्रशासनाकडून गहू, तांदूळ, साखर आदि वस्तूंचा पुरवठा करण्यात येत आहे. परंतु सदर धान्यपुरवठा हा निकृष्ट दर्जाचा असून, त्याऐवजी थेट रेडिमेड पीठ देण्यात यावे, अशी मागणी साधू-महंतांकडून होत आहे.सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी साधू-महंतांना रेशनमार्फत धान्यपुरवठा करण्यात येत आहे. परंतु सदर धान्य निकृष्ट दर्जाचे असून, गव्हात खडे आणि काडी-कचरा, भुसा मोठ्या प्रमाणावर आहे, अशी तक्रार अखिल भारतीय श्री पंच दिगंबर अनी आखाड्याचे महंत रामकिशोरदास शास्त्री यांनी केली आहे. तसेच रेशनमार्फत प्रत्येक साधूला महिन्याकाठी केवळ दोन किलो तांदूळ, तीन किलो गहू आणि अर्धा किलो साखर इतकाच पुरवठा करण्यात येणार आहे. हा माल अत्यंत अपुरा असून त्याचा दर्जा पाहिल्यास बाजारभावाप्रमाणेच आहे. फक्त एक रुपयाचा फरक दिसून येतो. त्यामुळे गव्हाचा पुरवठा करण्याऐवजी थेट तयार आटा (पीठ) दिल्यास सोयीचे होईल, असेही शास्त्री यांनी सांगितले. त्याप्रमाणे वारंवार मागणी करूनही अद्याप अनुदानित गॅस सिलिंडर मिळाले नसल्याने जादा दराने सिलिंडर खरेदी करावे लागत असल्याची तक्रार नर्मदा खंड खालसा, डाकोर खालसा, बालजी धाम खालसांमधील साधू-महंतांनी केली आहे. (प्रतिनिधी)
गव्हाऐवजी रेडिमेड पीठ देण्याची मागणी
By admin | Updated: August 1, 2015 23:56 IST