ओतूर : कळवण तालुक्यातील मार्कंड पिंप्री धरणातील पाणी उजवा कालवा काढून पाटचारीने ओतूर धरणात टाकण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.ओतूर धरणाचे पाणी गळती थांबविण्याचे काम येत्या काही दिवसात पूर्ण होणार आहे. गळती थांबली तर पाणीसाठा टिकणार आहे. परंतु ओतूर धरणाच्या वरती मुळाणे, मोहदर, वडाळे येथे पाझर तलाव असल्याने पाहिजे तसा पाणीसाठा धरणात होत नाही. त्यामुळे दरवर्षी सांडवा उशिरा पडतो व वरील मुळाणे खोऱ्यातूनही पाण्याची आवक कमी असल्याने सदरचा पाणी कव्हरेज एरिया कमी पडतो. जर मार्कंड पिंप्री धरणातून उजवा कालवा काढून सादड विहिरीमार्गे ओतूर धरणात पूरपाणी टाकले तर धरणात मेअखेरपर्यंत दरवर्षी पाणी राहील. म्हणून या धरणाखालील असंख्य गावांना त्याचा फायदा होणार आहे. तसेच पाटचारीचे अंतर तीन ते चार कि.मी. असल्याने सोयीचे असणार आहे. याबाबत जे. पी. गावित यांनीही लक्ष घालण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)
मार्कंड पिंप्री धरणातील पाणी ओतूर धरणात टाकण्याची मागणी
By admin | Updated: January 18, 2016 22:09 IST