घोटी : इगतपुरी तालुक्यातील मालूंजे येथील एका गतिमंद दलित युवकाच्या डोक्यात दुधाची किटली मारल्याने जखमी झालेल्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने दुधाची किटली मारणाऱ्या संशयितावर खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी इगतपुरी तालुका रिपाइंच्या वतीने तहसीलदारांकडे निवेदनाव्दारे करण्यात आली आहे. रिपाइं कार्यकर्त्यांची येत्या २५ आॅक्टोबर रोजी तातडीची बैठक आयोजित करण्यात आली असून, या बैठकीत आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष सुनील रोकडे यांनी दिली.याबाबत रिपाइंच्या वतीने तालुकाध्यक्ष सुनील रोकडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने तहसीलदार महेंद्र पवार यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन दिले. इगतपुरी तालुक्यातील मालूंजे येथील गतिमंद दलित युवक पंकज रु ंजा गवळे यास गावातीलच संशयित पंढरी गोपाळ गायकर याने किरकोळ वादातून डोक्यात दुधाची किटली मारल्याने पंकज गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर नाशिक येथे उपचार चालू असतानाच त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, याबाबत वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात केवळ गंभीर दुखापत करण्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला; मात्र या पंकजच्या मृत्यूनंतर खुनाचा गुन्हा दाखल करणे आवश्यक असताना, पोलिसांनी मात्र राजकीय दबावापोटी अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायदा आणि खुनाचा गुन्हा दाखल केला नसल्याचे निवेदनात स्पष्ट केले आहे. संशयितावर खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. (वार्ताहर)
खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
By admin | Updated: October 21, 2015 23:02 IST