नाशिक : शहराचा विस्तार वाढताना नागरिकांच्या स्वास्थ्यासाठी मनपाने खर्च करून बांधलेले रुग्णालय धूळ खात पडले असून, या रुग्णालयात तातडीने सर्व सोयी उपलब्ध करून देण्यात याव्यात व रुग्णालय पूर्ण क्षमतेने २४ तास सुरू करण्यात यावे, अशी मागणी नगरसेवक दिनकर पाटील यांनी केली. गंगापूर गावात महापालिकेने मागील सिंहस्थ काळात सुसज्ज रुग्णालय बांधले होते. गंगापूर, शिवाजीनगर, श्रमिकनगर, सोमेश्वर, धु्रवनगर, गोवर्धन गाव परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी ते उपयुक्त ठरणार होते. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कोट्यवधींचे बांधकाम धूळ खात पडले आहे. परिसरातील नागरिकांची मात्र वैद्यकीय सेवेसाठी परवड होत आहे. या पार्श्वभूमीवर नगरसेवक पाटील यांनी मनपाचे अतिरिक्त आयुक्त चव्हाण यांना निवेदन देऊन २४ तास सेवा देणारे रुग्णालय सुरू करण्याची मागणी केली आहे. तसेच चव्हाण यांनी रुग्णालयाची प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुस्थिती जाणून घेतली. यावेळी त्यांच्यासमवेत आरोग्य अधिकारी डॉ. गायकवाड होते. याबाबत तातडीने माहिती घेऊन रुग्णालय सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन चव्हाण यांनी दिले. यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गंगापूर रुग्णालय २४ तास सुरू ठेवण्याची मागणी
By admin | Updated: October 17, 2015 23:08 IST