लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत अनेक गैरव्यवहार घडले असतानादेखील आजवर आघाडी सरकारने बाजार समितीच्या दोषी संचालकांना पाठीशी घातले आहेत. त्यामुळे विद्यमान सरकारने बाजार समितीच्या गेल्या वीस वर्षांतील कामकाजाची श्वेतपत्रिका काढावी आणि त्यात गैरव्यवहार आढळल्यास संचालक मंडळ तत्काळ बरखास्त करावे, अशी मागणी भाजपाच्या मनोगत या नियतकालिकाचे समन्वयक रवींद्र अमृतकर यांनी केली आहे. अमृतकर यांनी यासंदर्भात सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना सविस्तर निवेदन दिले आहे. या बाजार समितीची वार्षिक उलाढाल १४०० कोटी रुपयांची असून, उत्पन्न सुमारे चौदा कोटी आहे. समितीवर शिखर बॅँकेचे पन्नास कोटी रुपयांहून अधिक कर्ज आहे. गेल्या वीस वर्षांत संचालकांचा कारभार वादग्रस्त राहिला आहे. बाजार समितीची जप्त मालमत्ताही परस्पर विक्री करण्याचे प्रयत्न केले, परंतु राज्य शिखर बॅँकेने त्यांच्यावर कारवाई न करता संरक्षण दिले, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. दोन वर्षांची आर्थिक पत्रके तयार नसणे, तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जप्त केलेल्या ५७ लाख रुपयांच्या रकमेची वस्तुस्थिती या सर्वांचा विचार करता बाजार समितीच्या सर्व नुकसानीची सक्त वसुली संचालनालयामार्फत चौकशी करावी, अशी मागणी अमृतकर यांनी केली आहे. पुरेसे उत्पन्न असतानाही संचालकांच्या शेतकरीविरोधी धोरणामुळे शेतमालाची चोरी, शेतकरी आणि व्यापाऱ्यांना मिळालेल्या मोबदल्याची लूटमार, असे प्रकार होत असतात. बाजार समितीकडे असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या जमिनी हेत्या. परंतु त्या रेडीरेकनरपेक्षा कमी दरात विकून संचालकांनी गैरव्यवहार केले आहेत.
नाशिक बाजार समिती बरखास्तीची मागणी
By admin | Updated: July 17, 2017 00:11 IST