मालेगाव : मालेगाव तालुुका दुष्काळी म्हणून जाहीर करावा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या शिष्टमंडळातर्फे प्रांताधिकारी संदीप पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटला तरी तालुक्यात पुरेसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकरीवर्ग अडचणीत आलेला आहे. त्याचबरोबर जीवनावश्यक वस्तूंच्या दरात मोठी वाढ झालेली आहे. दुष्काळी परिस्थिती असल्याने शेतकरी वीजबिले व कर्जाची परतफेड करू शकत नाही. त्यामुळे मालेगाव तालुका दुष्काळी जाहीर करावा. तसेच शेतकऱ्यांची वीजबिले माफ करावीत, शेतीपंपाची वीजजोडणी तोडू नये, शेतकऱ्यांच्या पीक कर्जावरील व्याज माफ करावे, कर्जात सवलत मिळावी तसेच बॅँकांनी कर्जवसुलीसाठी तगादा लावू नये, गुरांना चारा व पाणी उपलब्ध करून द्यावे, तालुक्यातील दुष्काळी गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे टॅँकर सुरू करावेत, अशी मागणी शिष्टमंडळातर्फे करण्यात आली आहे. यावेळी सदर शिष्टमंडळात राष्ट्रवादी कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजेंद्र भोसले, विजय पवार, नीलेश पाटील, धनंजय पाटील, किशोर इंगळे, अनंत भोसले, विजय जगताप, भाऊसाहेब वाघ, नितीन सोनवणे, जीवन गरुड आदि उपस्थित होते.
मालेगाव तालुका दुष्काळी जाहीर करण्याची मागणी
By admin | Updated: July 17, 2014 00:51 IST