मालेगाव : केंद्र शासनाने शेतकरी बांधवांच्या हिताच्यादृष्टीने कांदा निर्यात सुरू ठेवावी, अशी मागणी पणन व सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे बाजार समिती सभापती प्रसाद हिरे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. मालेगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात १३१ गावांचा समवेश आहे. तालुक्यातील कांदा हे प्रमुख नगदी पीक आहे. समितीचे कार्यक्षेत्रात मागील दोन ते तीन वर्षांपासून अत्यंत कमी पर्जन्यमानामुळे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. परिणामी पिकांची आणेवारी ०.५० पैशाचे आंत राहिलेली आहे. यंदा चांगल्या पर्जन्यमानामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळून शेतकरी बांधवांनी कांदा पीक घेतलेले आहे. केंद्र शासनाने कांदा या पिकाचा जीवनावश्यक वस्तूत समावेश करून शेतकरी बांधवांवर मोठा अन्याय केला आहे. बाजार समितीच्या मुंगसे कांदा खरेदी-विक्री केंद्रावर कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. कांद्याचे बाजारभाव दिवसेंदिवस कमी होत आहेत. त्यामुळे कांद्याचे चांगले उत्पादन घेऊनही कांदा पिकास योग्य असा बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडला आहे. केंद्र शासनाने कांदा निर्यात चालू ठेवावी. जेणेकरून देशांतर्गत कांद्याचे भाव स्थिर राहतील व शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार नाही. शेकऱ्यांच्या हितासाठी केंद्र शासनाने कांदा निर्यात सुरू ठेवावी, अशी मागणी समितीचे सभापती हिरे, बाजार समितीचे उपसभापती सुनील देवरे, संचालक व सचिव अशोक देसले यांनी केली आहे. (प्रतिनिधी)
केंद्राने कांदा निर्यात सुरू ठेवण्याची मागणी
By admin | Updated: February 5, 2017 00:20 IST