निफाड : तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथील मुंबई-आग्रा महामार्गावरील टोल नाका कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या आठवले गटाने केली आहे. पिंपळगाव येथील टोल नाक्यावर स्थानिक रहिवाशी आणि प्रवाशांना कर्मचाऱ्यांपासून त्रास होत आहे. तसेच अनेक वर्षापासून पिंपळगाव बसवंत आणि ओझर येथील उड्डाणपुलाची अनेक दिवसापासून मागणी होत आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. यासंदर्भात रिपाइंचे राज्य उपाध्यक्ष रवींद्र जाधव यांच्या नेतृत्त्वाखाली राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदन देण्यात येणार आहे. निफाड मार्केट कमिटी या ठिकाणी झालेल्या बैठकीत जाधव म्हणाले की, जनतेच्या आणि वाहतूकदाराच्या डोळ्यात धुळ फेकून टोल वसूल करण्यात आले आहे. राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्याबरोबर संबंधित टोल कंपनीने करार करून टोलद्वारे लूट सुरू केली आहे. रस्त्यावरील खड्ड्यामुळे पिंपळगाव, कोकणगाव, ओझर, दहावा मैल याठिकाणी अपघातामुळे प्राण गमवावा लागला. टोल बंद विरोधी आंदोलनासाठी रिपाइंच्या पुढाकाराने पिंपळगाव टोल विरोधीकृती समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष संजय गायकवाड यांनी केले. बैठकीस लासलगाव मार्केट समितीचे संचालक प्रमोद शिंदे, विनोद गायकवाड, संतोष सोनवणे, दादाभाऊ केदार आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)
पिंपळगाव येथील टोल नाका बंद करण्याची मागणी
By admin | Updated: November 19, 2015 23:32 IST