आझादनगर : राज्यातील शाह प्रवर्गातील नागरिकांना जातप्रमाणपत्र देण्यात यावे, या मागणीसाठी ५ आॅक्टोबरला नाशिकच्या विभागीय आयुक्त कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे, अशी माहिती अंजुमन मुस्लीम शाह बिरादरीचे प्रदेशाध्यक्ष अब्दुल रहेमान शाह यांनी पत्रकार परिषदेत दिली.राज्यातील मुस्लीम शाह, फकीर आणि छप्परबंद यांना सेवा हमी कायद्याअंतर्गत नमूद केलेल्या वेळेच्या आधारे म्हणजे २१ दिवसात जात प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी सूचना राज्याच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री यांनी देवूनही या समाजास जात प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ केली जात आहे.महाराष्ट्र शासनाने २० मार्च १९७८ रोजी शाह समाजास छप्परबंद म्हणून विमुक्त जातीच्या यादीत १४ क्रमांकावर स्थान देत विमुक्त दर्जा दिला. ११ नोव्हेंबर चे शासन पत्रान्वये छप्परबंदमध्ये शाह व फकीरचा समावेश केला. परंतु मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाने संघटनेच्या वतीने याचिका २७४/१९९३ चा निर्णय देताना छप्परबंद, शाह व फकीर हे एकाच जातीचे व्यक्ती आहे किंवा कसे? याबाबत चौकशी करण्याचा आदेश महाराष्ट्र राज्य समाज कल्याण संचालकांना दिला. संचालनालयाच्या निर्देशानुसार संचालक समाज कल्याण विभाग, पुणे यांनी चौकशी केली. ८ एप्रिल १९९४ रोजी सहवाल सादर करून या तिनही जाती एकच आहे म्हणून यांना विमुक्त जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे, जात प्रमाणपत्रा अभावी समाजातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. काहींचे जात पडताळणी विभागाकडे जात वैधता प्रमाणपत्रासाठी पडून असल्याने त्यांना नोकरीपासून मुकावे लागत आहे. म्हणून विभागीय आयुक्त नाशिक यांनी पत्राची दखल घेतली नाही तर संघटनेकडून ५ आॅक्टोंबर रोजी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात येईल, अशी माहिती रहेमान शाह यांनी दिली. यावेळी शरीफ शाह, गफ्फार शाह, लतीफ शाह उपस्थित होते. (वार्ताहर)
जातप्रमाणपत्र देण्याची मागणी
By admin | Updated: September 14, 2015 23:04 IST