नाशिक : ओझर येथील विमानतळ नागरी हवाई सेवेसाठी खुला झाल्यानंतर त्यावरून मुंबई- पुण्यापेक्षा दिल्लीपर्यंत सेवा सुरू करण्यासाठी नाशिककरांनी कौल दिला आहे. अर्थात, हे सर्वेक्षण अद्याप सुरूच असून, एक हजार नागरिकांनी त्यात सहभागी व्हावे यासाठी ट्रॅव्हल एजंट्स आॅफ नाशिक म्हणजे ‘तान’ या संस्थेच्या वतीने सुरू आहेत. येत्या १ आॅगस्ट रोजी एचएएलने विमान सेवा देणाऱ्या कंपन्यांची बैठक बोलविली असून, त्या पार्श्वभूमीवर ही तयारी करण्यात येत आहे.ओझर विमानतळावर पॅसेंजर टर्मिनल इमारत बांधून एक वर्ष झाले तरी येथून नियमित सेवा सुरू झालेली नाही. मध्यंतरी सी-प्लेन चालविणाऱ्या मेहेर कंपनीने नाशिक-पुणे ही सेवा सुरू केली असली तरी ती महागडी तर होतीच शिवाय एचएएलच्या तांत्रिक अडचणींमुळे ती स्थगित करण्यात आली आहे. श्रीनिवास एअरलाइन्स या नाशिकच्याच कंपनीने मुंबई-नाशिक - पुणे सेवा सुरू केली असली तरी तूर्तास मुंबई-नाशिक अशीच सेवा असून, तीन आॅगस्टपासून एचएएलची तांत्रिक अडचण दूर झाल्यानंतर ही सेवा सुरू होणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. याशिवाय कंपनीने मुंबई- नाशिक-सुरत सेवेची तयारी केली आहे. तथापि, नाशिककरांना कोणत्या ठिकाणी विमानसेवा गरजेची वाटते, यावरून तिची व्यवहार्यता ठरणार आहे. नाशिकमधून हवाई सेवा सुरू करू इच्छिणाऱ्या अनेक कंपन्यांशी चर्चा करण्यासाठी एचएएलने शनिवारी (दि.१) बैठक बोलाविली असून त्यात एअर इंडिया, इंडियन एअरलाइन्स, गोएआर, स्पाइस जेट, इंडिगो अशा अनेक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे यावेळी होणाऱ्या चर्चेत नाशिककरांना नेमक्या कोणत्या ठिकाणी विमानसेवेचा लाभ घ्यायला हवा, यासाठी माहिती संकलन करण्यात येत असून त्यासाठीच ट्रॅव्हल्स एजंट्स असोसिएशन आॅफ नाशिकने आॅनलाइन सर्व्हे सुरू केला आहे. गेल्या तीन दिवसात पावणे चारशे नागरिक यात सहभागी झाले आहेत. त्यापैकी ६० टक्के नागरिकांनी नाशिक ते दिल्ली अशा हवाई सेवेला पसंती दिली आहे. (प्रतिनिधी)
नाशिककरांची विमानसेवेसाठी दिल्लीला पसंती
By admin | Updated: July 29, 2015 01:09 IST