नाशिक : बारा ज्योतिर्लिगांपैकी एक असलेल्या आणि सिंहस्थ कुंभमेळ्याचे ठिकाण असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिराच्या डागडुजीच्या कामांना केंद्रीय पुरातत्व विभागाला अद्यापपर्यंत मुहूर्त लागला नाही. सिंहस्थातील मुख्य धार्मिकस्थळ असलेल्या त्र्यंबक मंदिराच्या कामांबाबत प्रशासनाकडून अनास्था दाखविली जात असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नाशिक तसेच त्र्यंबकेश्वर येथील कामांचा वेग अतिशय कमी आहे. त्यात सिंहस्थात प्रमुख असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिराच्या कामांना अद्यापपर्यंत मुहूर्त सापडत नसल्याने मंदिराची कामे वेळेत पूर्ण होतील काय? याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्र्यंबकेश्वर मंदिराची विकासकामे ही केंद्रीय पुरातत्व विभागाच्या माध्यमातून करण्यात येतात. मात्र, या विभागाकडे राज्य पुरातत्व विभागाने कुशल कारागिरांच्या अभावाचे कारण सांगत त्र्यंबकेश्वरमधील प्राचीन कुशावर्त तीर्थकुंड, त्रिभुवनेश्वर मंदिर, इंद्राळेश्वर मंदिर, बल्लाळेश्वर मंदिर व शहरातील श्री सुंदरनारायण मंदिर, निळकंठेश्वर मंदिराच्या डागडुजीचे काम सोपविल्याने त्र्यंबक मंदिराच्या कामांकडे दुर्लक्ष केले जात आहे. दर बारा वर्षांनीच त्र्यंबक मंदिराची डागडुजी केली जात असल्याने मंदिराची आतून-बाहेरून दयनीय अवस्था झाली आहे. आतून काही प्रमाणात केंद्रीय पुरातत्व विभागाने डागडुजीची कामे पूर्ण केली असली तरी बाहेरची कुठलीही कामे अद्यापपर्यंत पूर्ण झालेली नाहीत. मंदिराच्या बाहेरच्या बाजूने केमिकलच्या सहाय्य ाने साफसफाईचे काम होणे अपेक्षित होते. त्याचबरोबर मंदिराच्या दरवाजाची प्रचंड दुरवस्था झाल्याने त्याचेही काम होणे आवश्यक आहेत.
विलंब : केंद्रीय पुरातत्व विभागाला मिळेना मुहूर्त
By admin | Updated: April 20, 2015 23:22 IST