नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना आता त्यांची पदवी प्रमाणपत्रे डिजिलॉकर सुविधेद्वारे उपलब्ध करून देण्याबाबतच्या प्रणालीचे कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन यांच्या हस्ते शनिवारी (दि.१८) उद्घाटन करण्यात आले. यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे, परीक्षा नियंत्रक भटूप्रसाद पाटील, प्रोग्रॅमर राजेंद्र मरकड, डेटा प्रोसेसिंग सुपरवायझर प्रेमनाथ सोनवणे, सॉफ्टवेअर इंजिनिअर प्रदीपकुमार पवार आदी उपस्थित होते.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०१८-१९ व २०१९-२० मधील मे २०१९ व मे २०२० मधील परीक्षा उत्तीर्ण २ लाख ९० हजार विद्यार्थ्यांचे पदवी प्रमाणपत्र डिजिलॉकरमध्ये उपलब्ध होणार आहेत. उर्वरित पदवी प्रमाणपत्रेही टप्प्याटप्प्याने डिजिटल पद्धतीने उपलब्ध करून दिली जाणार आहेत. ‘डिजिटल इंडिया’ उपक्रमांतर्गत विद्यापीठ अनुदान आयोगाने अशाप्रकारे डिजिटल प्रमाणपत्र उपलब्ध करण्यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठास निर्देशित केले होते. त्यानुसार ही प्रणाली शनिवारपासून सुरू करण्यात आली आहे. भारतातील एकूण विद्यापीठे, राज्य शैक्षणिक शिक्षण मंडळ, शैक्षणिक संस्था यांच्यापैकी १७६ विद्यापीठे, राज्य शैक्षणिक शिक्षण मंडळ, शैक्षणिक संस्था यांनी डिजिलॉकरवर नोंदणी केली असून, डिजिलॉकरवर विद्यार्थ्यांचे पदवी प्रमाणपत्र उपलब्ध करून देणारे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ हे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र मुक्त विद्यापीठानंतर महाराष्ट्रातील दुसरे विद्यापीठ ठरले आहे.