नाशिक : कुपोषण रोखण्यासाठी प्रभावी ठरणारी ग्राम बालविकास केंद्रे यापुढेही सुरूच राहणार असून, त्यासाठी जिल्हा परिषदांनी त्यांच्या महिला व बालकल्याण विभागातील राखीव निधीचा वापर करावा, त्यासाठी राज्य शासन आवश्यक निधीची तरतूद करणार आहे, अशी माहिती वित्त व ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी काल (दि.२८) पत्रकारांशी बोलताना दिली.नाशिकला जिल्हा परिषदेच्या खातेप्रमुखांची आढावा बैठक घेतली. बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी वार्तालाप केला. नाशिक व इगतपुरी या पंचायत समित्यांच्या इमारतीसाठी शासन स्तरावरून निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, लवकरच मालेगाव व सुरगाणा पंचायत समित्यांना निधी उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच पेठ येथे पंचायत समितीसाठी नवीन इमारत मंजूर करण्यात येणार आहे.गेल्या दोन महिन्यांपासून नाशिकसह राज्यभरातील अंगणवाडीमार्फत सुरू असलेली ग्राम बालविकास केंद्रे बंद करण्यात आल्याकडे त्यांचे लक्ष वेधले असता दीपक केसरकर यांनी ही ग्राम बालविकास केंद्रे सुरूच ठेवण्यात येणार असून, त्यासाठी निधी तूर्तास जरी राज्य सरकारकडून उपलब्ध होत नसला तरी जिल्हा परिषदांनी त्यांच्या महिला व बालकल्याण विभागासाठी राखीव असलेल्या १० टक्के राखीव निधीतून या ग्राम बालविकास केंद्रांसाठी निधी वापरावा, आपण यासंदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत या ग्राम बालविकास केंद्रांसाठी निधीची तरतूद करण्याची सूचना करू, ही योजना चांगली असून ती अशी निधीअभावी बंद ठेवणे योग्य नाही. त्यांनी यावेळी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, तसेच आरोग्य व महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांना ही योजना तत्काळ सुरू करण्याचे आदेश दिले. प्रत्येक तालुक्यात महिला बचतगटांसाठी वस्तुविक्री केंद्रे उभारण्याबाबत नियोजन करण्यात येत असून, त्यानुसार जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणांना तसे नियोजन करण्याच्या सूचना केल्याचे केसरकर यांनी सांगितले. नाशिक जिल्ह्णात वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी जाणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची संख्या जास्त असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रांत वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त दिसत असून, ही पदे कोकण येथे राबविण्यात आलेल्या पथदर्शी प्रकल्पानुसार कंत्राटी स्वरूपात भरण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर, शिवसेना गटनेते जिल्हा परिषद सदस्य प्रवीण जाधव, उपसभापती अनिल ढिकले आदिंसह खातेप्रमुख उपस्थित होते. (प्रतिनिधी)
ग्राम बालविकास केंद्र सुरूच राहणार : दीपक केसरकर
By admin | Updated: September 29, 2015 00:14 IST