कळवण : कळवण नगरपंचायत पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत १७ प्रभागातील उमेदवारी अर्ज छाननी नंतर ११० उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी निलेश जाधव यांनी दिली. दि ९ आॅक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालयात सहाय्यक निवडणूक अधिकारी तहसीलदार अनिल पुरे यांच्या कक्षात निवडणूक निर्णय अधिकारी निलेश जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात आली. त्यात ७ उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात येऊन प्रभाग क्र १ मधील उमेदवार सौ प्रमिला राजेंद्र पगार व प्रभाग सात मधील उमेदवार राजेंद्र जगन्नाथ पगार यांनी तीन अपत्य असल्याचे शपथपत्रात नमूद केल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आला होता. मात्र छाननी वेळी उमेदवार व सूचक गैरहजर राहिल्याने त्यांना आज दि १० आॅक्टोबर सकाळी ११ वाजता आपले म्हणणे मांडण्यासाठी वेळ देण्यात आला होता. मात्र वेळेत कोणतेही पुरावे सादर करता न आल्याने महाराष्ट्र नगर परिषदा , नगर पंचायत व औद्योगीक नगरी अधिनियम १९५६ कलम १६ (१) खंड ज (के) कलम उमेदवार निवडणूक लढविण्यास अपात्र ठरतो असा निर्णय निवडणूक निर्णय अधिकारी निलेश जाधव यांनी दिला आहे. या निर्णयाने कळवण नगर पंचायत निवडणुकितील एक तुल्यबळ लढत रंगणार नसल्याने निवडणुकीतील हवाच निघून गेल्याची चर्चा चौकाचौकात रंगु लागली आहे. एकूण १७ प्रभागात १७ जागेंसाठी ११० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. दि. १९ आॅक्टोबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत माघारी घेत येणार आहेत. दि २० आॅक्टोबर रोजी निवडणूक चिन्ह वाटप करून उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. (वार्ताहर)
राजकीय चित्र बदलले
प्रभाग क्र मांक १ मध्ये कळवण पंचायत समितीचे माजी सभापती कौतिक पगार यांच्या पत्नी सुनिता पगार व कळवण सोसायटीचे संचालक राजेंद्र पगार यांच्यात तुल्यबळ लढतीचे चित्र निवडणुकीच्या पहिल्याच टप्प्यात रंगविण्यात आले होते. मात्र छाननी दरम्यान प्रमिला राजेंद्र पगार यांच्या उमेदवारी अर्जावर निर्णय देऊन उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आल्याने सुनिता कौतिक पगार यांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाल्याने कळवणच्या राजकीय पटलावरील चित्र बदलले आहे. शिवाय प्रभाग ७ मध्ये कौतिक पगार व कळवण सोसायटीचे संचालक राजेंद्र पगार यांच्यात दुरंगी लढत होणार होती तशी रणनिती कौतिक पगार विरोधकांनी आखली होती मात्र छाननी दरम्यान राजेंद्र पगार यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरविण्याबाबत मुदतीत कुठलेही कागदपत्रे सादर करण्यात राजेंद्र पगार यांना अपयश आल्याने पगार यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आला. त्यामुळे प्रभाग ७ मधून कौतिक पगार यांच्या निवडीचा मार्ग काही अंशी मोकळा झाला असून त्याच्यांशी भाजपचे प्रमोद पगार व कॉग्रेसचे दिलीप पगार, अपक्ष विनायक पगार यांच्याशी सामना करावा लागणार आहे.