नाशिक : सेवेत असताना कुणी कर्मचारी मयत झाला तर अनुकंपा तत्त्वावर मयताच्या वारसाला सेवेत घेण्याची तरतूद आहे. नियमानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या एकूण कर्मचाऱ्यांच्या पाच टक्के जागांवर अनुकंपा तत्त्वावर भरतीप्रक्रिया राबविता येते; परंतु नाशिक महापालिकेत गेल्या काही वर्षांत या नियमाला तिलांजली देत रिक्त जागांवर भरतीप्रक्रिया राबविण्याचे निर्णय प्रशासनाकडून घेतले गेल्याने आजमितीला अनुकंपा तत्त्वावरील सुमारे ४२ प्रकरणे प्रलंबित आहेत. पालिकेच्याच तत्कालीन अधिकाऱ्यांनी नियम डावलून घेतलेल्या निर्णयांमुळे ४२ वारसांना नोकरीची प्रतीक्षा करावी लागते आहे.महापालिकेत नोकरभरतीला शासनाची मनाई आहे. याशिवाय महापालिकेचा आस्थापना खर्चही ३८ टक्क्यांवर असल्याने महापालिकेला नव्याने नोकरभरती करता येत नाही. त्यामुळे महापालिकेच्या आस्थापनावर सुमारे १३०० पदे रिक्त आहेत. याचबरोबर दर महिन्याला सुमारे १० ते १५ कर्मचारी सेवानिवृत्त होत असल्याने वर्षाला सुमारे १२५ ते १५० कर्मचारी सेवानिवृत्त होत असतात. या सेवानिवृत्त होणाऱ्या एकूण कर्मचाऱ्यांच्या पाच टक्के कर्मचारी हे अनुकंपा तत्त्वावर भरण्यासंबंधीचा नियम आहे. परंतु गेल्या काही वर्षांत महापालिकेत प्रशासनाकडून या नियमाकडे दुर्लक्ष करण्यात येऊन रिक्त होणाऱ्या जागांवर भरती केली गेली. त्यात मयत कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर सेवेत सामावून घेण्याबाबत फारसा विचार झाला नसल्याने अनुकंपा तत्त्वावरील प्रतीक्षा यादी वाढतच चालली आहे. आजमितीला ४२ प्रकरणे महापालिका प्रशासनाकडे प्रलंबित आहेत. रिक्त जागाच नसल्याने या प्रकरणांची फाईलच पुढे सरकत नाही. त्यामुळे अनुकंपा तत्त्वावर सेवेत जाण्यासाठी संबंधित उमेदवारांची प्रतीक्षा कायम आहे. या आधी मनपा आयुक्तांनी अनुकंपा तत्त्वावरील भरती त्वरित केली जाणार असल्याचे जाहीर केले होते त्यामुळे या उमेदवारांना आशा लागून राहिली आहे. (प्रतिनिधी)
अनुकंपा तत्त्वावरील भरतीला पालिकेच्या निर्णयाचा अडसर
By admin | Updated: May 8, 2015 23:47 IST