लोकमत न्यूज नेटवर्कनामपूर : येथील भिकन श्रावण सावंत (५१) यांनी रविवारी दुपारी शेतात काम करीत असताना शेजारील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली .भिकन श्रावण सावंत यांची नामपूर शिवारात दोन एकर जमीन आहे . नित्यनियमाप्रमाणे ते शेतात गेले .त्यानंतर त्यांनी शेजारील इजमाने शिवारातील गोटू धोंडगे यांच्या विहिरीत उडी मारली. ते अचानक गायब झाल्यामुळे त्यांच्या परिवारातील लोकांनी त्यांचा शोध घेतला मात्र ते कुठेही दिसले नाहीत . सायंकाळी ४ वाजेच्या दरम्यान धोंडगे यांच्या विहिरीजवळ पायातील चपला आजुबाजूच्या शेतकऱ्यांना दिसल्या . विहिरीत डोकावून पाहिल्यावर सुमारे २५ फूट पाण्यात त्यांचा मृतदेह दिसला. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अशोक सावंत , खेमराज कोर यांनी या घटनेची माहिती नामपूर पोलिस ठाण्यात दिली .सहायक पोलीस उपनिरीक्षक श्रीराम कोळी , हवालदार एस एन मोरे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. सदर मृतदेह नामपूरच्या ग्रामीण रु ग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला .मयत शेतकरी भिकन सावंत यांच्यावर नामपूर सोसायटीचे सुमारे दोन लाख रुपयांचे कर्ज होते. तसेच खासगी हातउचल ५० ते ६० हजार रुपयांची होती .नुकत्याच जाहीर झालेल्या कर्जमाफीत आपले कर्ज माफ होईल,अशी अपेक्षा त्यांना होती.मात्र जाचक अटींमुळे या कर्जमाफी पासून ते वंचित राहिले आहेत . मुलाचे लग्न , कुटुंबाचा दैनंदिन खर्च ,शेतातील बियाणे ,औषधे ,खते यासाठी पैसे कोठून आणायचे या विवंचनेत ते होते. यातूनच त्यांनी आपली जीवनयात्रा संपविली असल्याची चर्चा परिसरात होत आहे . नामपूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक श्रीराम कोळी , विजयकुमार ठाकूरवाड करीत आहेत .
नामपूरला कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या
By admin | Updated: July 3, 2017 01:58 IST