महापालिकेच्यावतीने महिलांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण दिले जाते. त्यासाठी दरवर्षी निविदा मागविल्या जातात. मात्र, गेल्या काही वर्षांपासून एकच ठेकेदार असून यंदा दोघांत चुरस आहे. त्यातच महापालिकेतील काही पदाधिकारी आणि नगरसेवकांचा हस्तक्षेप झाल्याने आता प्रशासनाने तांत्रिक बीड उघडले. मात्र, फायनान्शियल बिड उघडलेले नाही. हा विषय आता आयुक्तांकडे गेला असून त्यावर ते निर्णय घेणार आहेत असे सांगितले जात आहे.
महिला प्रशिक्षणाच्या ठेक्यांसाठी प्रस्थापित ठेकेदाराच्या संदर्भात नगरसेवकांत दोन गट पडले असून दरवर्षी त्याच ठेकेदाराला देण्यात येणारे काम संशयास्पद असल्याचे पत्र काही नगरसेवकांनी सभापती स्वाती भामरे यांना दिले आहे. आदिवासी आयुक्त विभागात या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकल्याचा दावादेखील या नगरसेवकांनी केला असून केवळ विशिष्ट हेतू डोळ्यासमोर ठेवून प्रशासनाने महापालिकेत ८० टक्के काम केल्याचा अनुभव असावा अशी अट टाकल्याची तक्रार करण्यात अली आहे. तर दुसरीकडे मात्र काही नगरसेवकांनी याच ठेकेदाराचे समर्थन केले आहे. त्यामुळे ठेकेदारावरून नगरसेवकांत फूट पडल्याचे दिसत आहे. ठेकेदारावरून नगरसेवकांत जुंपलेल्या वादामुळे महिलांचे प्रशिक्षण मात्र रखडले आहे.