दरेगाव : चांदवड तालुक्यातील दरेगाव येथे तलावात बुडून दोन सख्ख्या चुलतभावांचा मृत्यू झाला. रामदास भगवंत देवरे (१६) हा दहावीत शिक्षण घेणारा व ज्ञानेश्वर जनार्दन देवरे (१३) हा सातवीत दुगाव येथील महात्मा फुले माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेत होता. त्यांच्या मृत्यूने दरेगाव परिसरात शोककळा पसरली आहे. दरेगाव येथील शेतकरी भगवान देवरे व जनार्दन देवरे हे दोघे भाऊ शेतात राहतात. त्यांची मुले रामदास व ज्ञानेश्वर हे दोघे दुगाव येथे महात्मा फुले विद्यालयातून स्वांतत्र्य दिनाचा कार्यक्रम आटपून घरी आले. शाळेला सुट्टी असल्याने जेवण करून घराजवळच गुरे चारण्यासाठी डोंगरालगतच्या परिसरात गेले होते. त्याठिकाणी तलाव आहे. त्याजवळून जात असताना पात्र घसरून तलावात पडल्याने या दोघा भावांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज आहे. भगवान देवरे हे शेतातून सायंकाळी ५ वा. घरी आले असता, मुले रामदास व ज्ञानेश्वर त्यांना घरी दिसले नाहीत म्हणून त्यांचा शोध घेत असताना भगवान यांना चप्पल आढळून आली. आजूबाजूला तपासणी केली; मात्र त्यांच्या शोध न लागल्याने चप्पल ओळखून भगवान देवरे यांनी आजूबाजूच्या शेतकऱ्यांना बोलावले. त्यात दोन-तीन पोहता येणाऱ्यांनी धाव घेऊन एका भावाचा मृत्युदेह हाती लागला. त्यानंतर सुमारे तब्बल दीड तासानंतर दुसऱ्या मुलाचा शोध लागला. मात्र त्यांना पाण्यातून वर काढण्यापूर्वीच त्यांचा मृत्यु झालेला होता. सदर घटनेची माहिती दरेगावचे पोलीसपाटील सोमनाथ गांगुर्डे यांनी चांदवड पोलीस स्टेशनला दिली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले. त्यानंतर रात्री ११ वाजेच्या सुमारास शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. (वार्ताहर)
तलावात बुडून दोघा चुलत भावांचा मृत्यू
By admin | Updated: August 18, 2016 01:40 IST