नाशिक : आॅक्टोबर महिन्यात दसरा-दिवाळी दरम्यान ग्रंथप्रेमींसाठी पर्वणी असून महापालिकेच्या वतीने दि. १४ ते २३ आॅक्टोबर या कालावधीत दहा दिवसांसाठी गोल्फ क्लब मैदानावर ग्रंथयात्रा भरविली जाणार आहे. तब्बल अठरा वर्षांनंतर महापालिकेच्या वतीने ग्रंथयोग जुळून येणार आहे.मागील वर्षी महापौर अशोक मुर्तडक व उपमहापौर गुरुमित बग्गा यांनी अंदाजपत्रकात ग्रंथयात्रेसाठी खास २५ लक्ष रुपयांची तरतूद केलेली होती. त्यानुसार, मे महिन्यात सुटीच्या काळात दहा दिवसांसाठी ग्रंथयात्रा भरविण्याचे नियोजन होते. परंतु दुष्काळी स्थितीमुळे निर्णय स्थगित ठेवण्यात आला होता. आता ग्रंथयात्रा दि. १४ ते २३ आॅक्टोबर या कालावधीत भरविण्याचे नियोजन करण्यात आले असून त्यासाठी गोल्फ क्लब मैदानावर भव्य वॉटरप्रूफ डोम उभारला जाणार आहे. सदर ग्रंथयात्रेत देशभरातून सुमारे दीडशे ते दोनशे प्रकाशकांना निमंत्रित केले जाणार आहे. याशिवाय दररोज मान्यवर व्याख्यात्यांची वैचारिक मेजवानी असणार आहे. त्याचबरोबर निमंत्रितांचे कविसंमेलनही भरविण्याचे नियोजन आहे. कॉँग्रेसचे नगरसेवक शाहू खैरे हे १९९८-९९ या काळात स्थायी समितीचे सभापती असताना महापालिकेच्या वतीने त्यांच्या संकल्पनेतून जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील छत्रपती शिवाजी मैदानावर ग्रंथयात्रा भरविण्यात आली होती. या गं्रथयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभून सुमारे ५० लाख रुपयांची ग्रंथसंपदा विक्री झाली होती. नाशिकला साहित्य संमेलनाचे यजमानपद न मिळाल्याने महापालिकेने सदर ग्रंथयात्रेचे आयोजन केले होते. मात्र, सलग दुसऱ्या वर्षी बजेट तरतूद नसल्याचे कारण दर्शवित महापालिकेने ग्रंथयात्रा भरविण्यास नकार दिला होता. त्यामुळे शाहू खैरे यांच्या संस्कृती नाशिक या संस्थेमार्फत प्रायोजकांच्या मदतीने डोंगरे विद्यार्थी वसतिगृहाच्या मैदानावर ग्रंथयात्रेचा प्रपंच मांडण्यात आला होता. त्यावेळीही नाशिककरांचा उदंड प्रतिसाद लाभला होता. आता तब्बल अठरा वर्षांनंतर महापालिकेमार्फत पुन्हा एकदा ग्रंथयोग जुळून येत आहे. (प्रतिनिधी)
दसरा-दिवाळी दरम्यान ‘ग्रंथयात्रा’
By admin | Updated: August 26, 2016 23:37 IST