येवला : येवला शहरातून जाणाऱ्या नगर-मनमाड राज्य महामार्ग क्र मांक १० च्या शहर हद्दीत दुभाजकांवर टोल कंपनीने लावलेले हायमास्ट (दिवे) केवळ शोभेच्या वस्तू बनल्या असून, हे दिवे सहा महिन्यांपासून बंद असल्याने दिव्याखाली अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. शहरातील हे अंधाराचे जाळे कधी फिटणार, अशी विचारणा नागरिक करू लागले आहेत. संवेदना बोथट झाल्याने सोशिक येवलेकरदेखील सवय झाल्याप्रमाणे ब्र बोलायला तयार नाहीत. बीओटी आणि नगरपालिका यांच्यातील तू तू मै मै मुळे येवला नगरपालिका हद्दीतून असणारे हे पथदीप अखेरची घटका मोजत आहेत.शहर व शहरवासीयांची काळजी करणारा कोणी शिल्लक राहिला आहे की नाही, अशी विचारणा या रस्त्यावरून जाणारे-येणारे करीत आहेत. शहरातून जाणाऱ्या नगर- मनमाड महामार्गावरून जाताना मुंबईच्या मरीन ड्राइव्हवर असल्याचा भास होतो. अशा प्रकारची प्रशंसा येवला भेटीत दिग्गज पार्श्वगायक सुरेश वाडकर, सिनेअभिनेते सुनील शेट्टी यांच्यासह एकसे बढकर एक सेलिब्रिटी करून गेलेत. हल्ली मात्र या रस्त्यावर अंधाराचे जाळे पसरले असून, दुभाजकांची अवस्थादेखील खराब झाली आहे. विंचुर चौफुली व फत्तेबुरूज नाक्यावरील चौफुलीच्या मध्यभागी हायमास्क लावून त्यावर सर्व बाजूंना प्रकाश पडावा म्हणून पाच-सहा दिवे दिवसा दिसतात मात्र ते रात्री बंद असतात. मनमाड-नगर हा महामार्ग प्रचंड वाहतुकीचा असून, मोठ्या प्रमाणात वर्दळ असल्याने सर्व दिवे लागणे आवश्यक आहे. या सर्व पथदीपांच्या देखभालीची जबाबदारी येवले शहराजवळ असलेल्या टोलनाक्यावरील ठेकेदाराची की येवला पालिकेची, हा प्रश्न अद्यापही सुटला नाही. यासंदर्भात काही कार्यकर्त्यांनी निवेदन देऊन तक्रारी केल्या पण त्याचा काही परिणाम झालाच नाही. आमदार छगन भुजबळ मतदारसंघात नित्यनियमाने यायचे तोपर्यंत परिस्थिती चागली होती. आता मात्र सध्या दिव्याचे आत्मवृत्त लिहिण्याची वेळ आली आहे. बीओटी तत्त्वावर झालेला हा रस्ता व त्या रस्त्यावर दिवे लावण्यासह देखभाल दुरुस्तीचा खर्च बीओटी प्रशासनाने करायचा आहे. परंतु देखभालीसह वीजबिलाचा खर्च पालिकेने सोसून ही यंत्रणा पालिकेने ताब्यात घ्यावी, अशा आशयाचे पत्र बीओटी प्रशासनाने पालिकेला दिले होते. पालिकेच्या सर्वसाधारण सभेत आरडाओरड करीत आपल्या अज्ञानाचे प्रदर्शन करणारे नगरसेवक याबाबत ठोस भूमिका का घेत नाहीत, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. (वार्ताहर)
येवला हद्दीतील नगर-मनमाड राज्य महामार्गावर अंधार
By admin | Updated: September 12, 2016 00:27 IST