नाशिक : शहरात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच, आता या आजाराने काहीसे घातक वळण घेतले असून, डेंग्यूमुळे प्लेटलेट्सच नव्हे, तर सर्वच पेशींची संख्या झपाट्याने घटत असल्याचे निष्पन्न होऊ लागले आहे. महापौरांनी डेंग्यूसंदर्भातील उपाययोजना करण्यासाठी बोलावलेल्या बैठकीत ही माहिती देण्यात आली आहे.या बैठकीस चांदवडचे आमदार तथा इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राहुल अहेर उपस्थित होते. त्यांनी ही माहिती दिली आहे. सध्या डेंग्यू रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. खासगी वैद्यकीय व्यावसायिकांकडे दाखल होत असलेल्या रुग्णांचे रक्तनमुने स्थानिक पातळीवरील लॅबमध्ये पाठविले जातात; परंतु गेल्या काही दिवसांत मुंबईतही काही प्रयोगशाळेत रक्तनमुने पाठविण्यात आले आहेत. सामान्यत: रक्तबिंबिका (प्लेटलेट्स) कमी झाल्या की डेंग्यूची लागण झाल्याचे वैद्यकीय व्यावसायिक सांगतात; परंतु आता डेंग्यूची लागण झालेल्या काही रुग्णांमध्ये केवळ रक्तबिंबिकाच नव्हे, तर प्रतिकारशक्ती असलेल्या पांढऱ्या पेशी तसेच तांबड्या पेशी आणि हिमोग्लोबिन कमी होत असल्याचे आढळले आहे. डॉ. राहुल अहेर यांनी ही माहिती दिली.यासंदर्भात महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बी. आर. गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हा पॅनसायरोपेनिया प्रकार असल्याचे सांगितले. खासगी वैद्यकीय व्यावसायिकांकडे असे रुग्ण आढळल्याचे डॉ. अहेर यांनी सांगितले असले, तरी पालिकेला मात्र तसे कळवलेले नाही. पालिकेकडे फक्त कोणती टेस्ट पॉझिटिव्ह आढळली याची माहिती दिली जाते. त्यामुळे पालिकेकडे ही माहिती नाही. डेंग्यूचा विषाणू सशक्त झाल्यास असा बदल होऊ शकतो. त्यासंदर्भात शासन अधिकृतपणे काही स्पष्ट करू शकते, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)
डेंग्यूने घेतले घातक वळण
By admin | Updated: November 6, 2014 00:23 IST