नाशिक : पतसंस्थेत ठेवलेल्या ठेवीची मुदत संपूनही खातेदारांना रक्कम परत करण्यास टाळाटाळ करणारे देवळा येथील रामचंद्र विनायक कोठावदे ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेच्या चौदा संचालकांना ग्राहक न्यायालयाने दोषी ठरविले आहे़ दिवाळखोरीत निघालेल्या या पतसंस्थेच्या संचालकांनी ९ खातेदारांना सुमारे २५ लाखांची रक्कम व्याजासह परत करण्याचे आदेशही ग्राहक न्यायालयाचे न्यायाधीश मिलिंद सोनवणे व मंचचे सदस्य प्रेरणा काळुंखे-कुलकर्णी, कारभारी जाधव यांनी दिले आहेत. ही रक्कम प्रत्यक्ष हातात मिळेपर्यंत १० टक्के व्याज देण्यात यावे असेही या आदेशात म्हटले आहे़ देवळा येथील कोठावदे पतसंस्थेच्या विरोधात राकेश पांडुरंग अहेर (रा़देवळा) यांच्यासह ९ खातेदारांनी जिल्हा ग्राहक न्यायालयात दावा केला होता़ अहेर व खातेदारांनी पतसंस्थेमध्ये ठराविक मुदतीच्या योजनेमध्ये ठेवी ठेवल्या होत्या़ मात्र, ठेवीची मुदत संपूनही खातेदारांना रक्कम मिळाली नाही तसेच पतसंस्थाही दिवाळखोरीत निघाली़ या प्रकरणात संचालकांवर आर्थिक अपहार केल्याप्रकरणी देवळा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हाही दाखल करण्यात आला़ तक्रारदार राकेश अहेर यांच्यासह खातेदारांनी अॅड सिमन्तिनी पंडीत यांच्यामार्फत ६ जुलै २०१५ रोजी ग्राहक न्यायालयात पतसंस्थेचे संचालक एन. जी. वैद्य, किसन परशराम खरोटे, जयप्रकाश भालचंद्र कोठावदे, सुधाकर भालचंद्र कोठावदे, मेघनाथ रघुनाथ शेवाळकर, रवींद्र विश्वनाथ अहिरराव, भगवान श्रावण बागड, गंगाधर नारायण राणे, प्रताप रुमचंद सांबरे, गणेश सुकदेव निकम, मंगला दत्तात्रय मेतकर, रब्बानी इस्माईल तांबोळी, नानाजी तुळशीराम पवार, भालचंद्र गोविंद नेरकर यांच्याविरोधात खटला दाखल केला होता़ ग्राहक न्यायालयात सुरु असलेल्या खटल्यात पतसंस्थेचे १४ संचालक दोषी आढळून आले़ न्यायालयाने अहेर यांच्यासह ९ खातेदारांची मुदतठेवीची २५ लाख ५ हजार ८२६ रुपयांची रक्कम मुदत ठेवीच्या व्याजासह तसेच रक्कम खातेदारांच्या हातात पडेपर्यंत दहा टक्के व्याजाने देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच तक्रारदारांना मानसिक व आर्थिक त्रासाबद्दल प्रत्येकी दहा हजार रुपयांचा खर्च देण्याचेही आदेशात म्हटले आहे़ (प्रतिनिधी)
देवळ्याच्या पतसंस्थेला दणका!
By admin | Updated: January 19, 2017 01:00 IST