इंदिरानगर : परिसरातील नवरात्रोत्सव मंडळांनी युवक-युवतींची गर्दी खेचण्यासाठी अनेक स्पर्धा सुरू केल्या असून, उत्कृष्ट दांडिया, गरबा, रास खेळणाऱ्यांसाठी बक्षिसांची लयलूट करण्यात येणार आहे. पैठणीपासून एलईडी टीव्ही संचापर्यंतची बक्षिसे दिली जाणार असून, त्यामुळे यंदाचा नवरात्रोत्सव गाजणार आहे.इंदिरानगर परिसरात दरवर्षीच नवरात्रोत्सव उत्साहात साजरा केला जातो. अनेक मंडळांच्या वतीने गरबा दांडिया हे खास आकर्षण असते. यंदाही दांडियाची धूम असणार आहे. इंदिरानगर परिसरातील बहुतांशी मंडळांनी गर्दी खेचण्यासाठी आकर्षक दांडिया खेळणाऱ्यांना, तसेच वेशभूषा करणाऱ्यांना आणि जोडप्यांसाठी खास बक्षिसांचे नियोजन करण्यात आले आहे. भाजपा प्रणित युनिक ग्रुपच्या वतीने युवती आणि महिलांसाठीच यंदा आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना आकर्षित करण्यासाठी युनिक गु्रुपने दररोज दहा बक्षिसे देण्याची तयारी केली आहे. विद्यार्थिनी, युवती, महिला आणि प्रेक्षकातील एक महिला अशा चार पैठण्या देण्यात येणार आहेत. वेशभूषा, उत्कृष्ट दांडिया आणि तत्सम बक्षिसे देण्यात येणार आहेत. याशिवाय महिलांच्या स्वयंरोजगाराला वाव मिळावा यासाठी तीस स्टॉल्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच प्रजापती ब्रह्माकुमारी संस्थेच्या वतीने देवीचे जिवंत देखावे रोज सादर केले जाणार आहेत, अशी माहिती मंडळाचे संस्थापक अध्यक्ष नगरसेवक सतीश सोनवणे यांनी दिली.शिवसेना प्रणित गणेश युवा मित्रमंडळाच्या वतीनेदेखील अशाप्रकारच्या बक्षिसाच्या योजना राबविण्यात येणार आहेत. दांडिया गरबासाठी प्रथम क्रमांकाचे बक्षीस म्हणून ३२ इंची एलईडी टीव्ही, तसेच व्दितीय क्रमांसाठी वॉशिंग मशीन, तृतीय क्रमांकासाठी फ्रीज आणि वेशभूषेसाठी रोख बक्षीस देण्यात येणार आहे, असे मंडळाचे अध्यक्ष गणेश जाधव यांंनी सांगितले. तसेच सह्याद्री युवक मित्रमंडळांच्या वतीने चेतनानगर येथील श्रीकृष्ण मंदिरासमोर दांडियाचे आयोजन करण्यात आले आहे. चेतनानगर येथील बाजीराव फाउंडेशनच्या वतीने आयोजित नवरोत्सवात दांडिया किंग आणि क्वीन तसेच उत्कृष्ट वेशभूषा अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत, अशी माहिती साहेबराव आव्हाड यांनी दिली.
‘दांडिया रास’मध्ये यंदा बक्षिसांची लयलूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2015 22:55 IST