मालेगाव शिवरोड : मालेगाव तालुक्यातील साकुरी येथे मंगळवारी रात्री ढगफुटी होऊन शेतकऱ्यांसह ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सकाळी तहसीलदार चंद्रजितसिंग राजपूत यांनी तत्काळ साकुरी गावास भेट देली. ढगफुटीने प्रचंड पडलेल्या पावसामुळे झालेले नुकसान, तसेच बिरोबा महाराज मंदिराजवळील इंदिरानगरमध्ये घरात शिरलेल्या पाण्याची पाहणी केली. पाणी तुंबत असल्यामुळे पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे सदर नगरातील घरांमध्ये पाणी शिरले आहे. इंदिरानगरमधील बऱ्याच लोकांनी अतिक्रमण केलेले असल्यामुळे पाणी जाण्यासाठी मार्ग उपलब्ध नाही. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत अतिक्रमण केलेल्या लोकांना नोटीस देण्यात आली. त्यांना अतिक्रमणे हटविण्याबाबत सांगण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागाला तेथील पाणी बाहेर काढण्यासाठी चारी करण्याबाबत सांगण्यात आले. शेतात शिरलेल्या पाण्याची, त्यामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केली.
--------------------------
नागरिकांची पर्यायी व्यवस्था
जवळजवळ पूर्ण गावातील शेत पिकाचे नुकसान झालेले त्यांनी पाहिले. जास्त नुकसान गाव नदीच्या काठावरील शेतांचे झालेले आहे, तसेच ज्या लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरले आहेत त्या लोकांची पर्यायी व्यवस्था बिरोबा महाराज धर्मशाळेमध्ये करण्यात आली, तसेच तत्काळ झालेल्या नुकसानाचे पंचनामे करण्यात येऊन लवकरात लवकर नुकसानग्रस्त लोकांना तत्काळ मदत पुरविली जाईल, असे आश्वासन तहसीलदार राजपूत यांच्याकडून देण्यात आले. राष्ट्रवादीचे विनोद शेलार, कोमल ठोके, ज्ञानेश्वर हिरे, साखरचंद इंगळे यांनीही मदत केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अशोक कानडे, शिवसेना शाखाप्रमुख गोरख ठोके, शरद आजगे व ग्रामस्थांनी रात्रीच्या वेळेला झालेल्या नुकसानग्रस्त गावकऱ्यांना मदत केली. पालकमंत्री छगन भुजबळ, जिल्हाधिकारी व प्रांत यांना तत्काळ साकुरी गावावर झालेल्या संकटाबाबत माहिती दिली. भाऊसाहेब पाटील यांनी पंचनाम्यासाठी मदत केली.
------------
मालेगाव तालुक्याचे साकुरी येथे ढगफुटीने झालेल्या नुकसानीची पाहणी करताना तहसीलदार चंद्रजितसिंग राजपूत. (०८ मालेगाव साकुरी)
080921\08nsk_8_08092021_13.jpg
०८ मालेगाव साकुरी