खामखेडा : खामखेडा गावासह परिसरात कोबी पिकावर काटकरपा व अळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी चिंतातुर झाला आहे.खामखेडा, सावकी, पिळकोस, भादवण, विसापूर, भऊर, बगडू आदि परिसरात कोबी पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. कोबी पीक हे शेतकऱ्याला गेल्या काही वर्षांपासून आर्थिकदृष्ट्या परवडत असल्याने गेल्या दोन-तीन वर्षांपासून खामखेडा व परिसरात मोठ्या कष्टाने कोबीच्या उत्पादनावर शेतकऱ्याने अनेक स्वप्नं फुलविली आहेत. कोबी उत्पादनात खामखेडा व परिसराचे नाव गुजरात राज्यातील अहमदाबाद, सुरत, बडोदा आदि मार्केटमध्ये आहे. तेथील काही व्यापारी कोबी खरेदीसाठी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन कोबी खरेदी करतात. त्यामुळे परिसरातील तरुणांना कमिशन म्हणून रोजगार मिळतो. मजूर वर्गाला काम मिळते.परंतु चालू वर्षी पावसाळा कमी असल्याने कमी दिवसात येणाऱ्या अल्पशा पाण्यावर कोबी पिकाची लागवड केली होती. परंतु यावर्षी कमी पाऊस व उष्ण वातावरणामुळे कोबी पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव दिसून आला. सुरुवातीला कोबीवर काळा, नारंगी, करपा, घाण्या करपस, कीड, अळीरोगाचा प्रादुर्भाव दिसून आला. त्यामुळे पिकांची वाढ खुंटते व कोबीचे नुकसान होते. अनेक महागड्या औषधांची फवारणी करूनही पीक आटोक्यात येत नसल्याने काही शेतकऱ्यांना कोबीचे पीक सोडून देण्याची वेळ आली आहे. त्यात निसर्गाची साथ न मिळाल्याने उत्पादन खर्चात वाढ होऊन शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे.तसेच सध्या कोबीच्या भावातही मोठ्या प्रमाणात घसरण झाल्यामुळे पिकावर केलेला खर्चही भरून मिळत नाही. त्यामुळे शेतकर्ऱ्याला आर्थिक फटका बसला आहे. (वार्ताहर)
कोबी पिकावर काटकरपा, अळीचा प्रादुर्भाव
By admin | Updated: July 30, 2016 00:12 IST