कळवण : जागतिकीकरणामुळे व्यवसायातील स्पर्धा मोठ्या प्रमाणात वाढली असून, ग्राहकांच्या फसवणुकीचे अनेक प्रकार समोर येत असल्याने ग्राहकांनी कुठलीही वस्तू विकत घेताना पक्क्या बिलाची पावती घ्यावी व आपली फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी, असे प्रतिपादन तहसीलदार कैलास चावडे यांनी केले. जागतिक ग्राहक दिनानिमित्त कळवण येथील तहसील कार्यालयात शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष कळवण व तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राहक जागृती व प्रबोधन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, त्याप्रसंगी चावडे बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून स्टेट बँकेचे शाखा व्यवस्थापक उदय कुलकर्णी, अॅड. नानासाहेब पगार, शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष जिल्हाप्रमुख संजय रौंदळ आदि उपस्थित होते.चावडे पुढे म्हणाले की, ग्राहकांनी खरेदी करताना नेहमी चौकस असणे गरजेचे असते. आपल्यासोबतच इतर कुठल्याही व्यक्तीची फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यास तक्रार करावी. अॅड. नानासाहेब पगार यांनी ग्राहक संरक्षण कायद्याविषयी मार्गदर्शन केले. स्टेट बँकेचे शाखा व्यवस्थापक उदय कुलकर्णी यांनी कॅशलेस व्यवहाराचा वापर करण्याचे आवाहन केले. शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे जिल्हाप्रमुख संजय रौंदळ यांनी ग्राहकांनी कुठेही फसवणूक झाल्यास कक्ष पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन केले. ग्राहक संरक्षण कक्षाच्या वतीने तहसील कार्यालयास शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट देण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन कक्ष तालुकाप्रमुख राजू पूरकर, किशोर पवार यांनी, तर सूत्रसंचालन किशोर ततार यांनी केले. (वार्ताहर)
‘ग्राहकांनी बाजारात सर्तक राहावे’
By admin | Updated: March 16, 2017 22:42 IST