ममदापूर : दुर्गरक्षक प्रतिष्ठान आयोजित किल्ले सरसगड मोहिमेत सरसगड किल्ल्याच्या संवर्धनाचे कार्य दुर्गरक्षकांच्या मदतीने करण्यात आले. या मोहिमेत राज्यभरातून जवळपास १२० ते १३० दुर्गरक्षकांनी सहभाग नोंदवून कार्य पार पाडले.यावेळी प्रामुख्याने गडाच्या तटबंदी आणि गडाची ऐतिहासिक प्रवेशद्वारं झाडाझुडपांतून मोकळी करण्यात आली. यावेळी महत्त्वाचा मानला जाणारा गडाच्या मागच्या बाजूला असलेला; पण दुर्लक्षित असलेला दिंडी दरवाजा हा पूर्णपणे झुडपांमध्ये लुप्त झाला होता. पण दुर्गरक्षकांनी मेहनत घेऊन प्रवेशद्वार नको असलेल्या झाडांच्या गर्दीतून मुक्त करून दिले.सरसगड पाली येथे असणारा हा गड सातवाहनकालीन असून, निजामशाहीनंतर मराठ्यांनी आपल्या ताब्यात घेतला. गडावर शिवलिंग, महादेवाचे मंदिर, पाण्याचे हौद, धान्यकोठार, शस्त्रकोठार आहेत.यावेळी प्रतिष्ठानमध्ये संशोधक आणि शस्त्रमानव म्हणून कार्यरत असणारे राहुल गोरे यांना जुनी कट्यार सापडली.दुर्गरक्षक प्रतिष्ठान महा.राज्य प्रतिष्ठान अध्यक्ष आनंदराव जाधव यांनी राज्यातील सर्व दुर्गरक्षकांना गड किल्ले संवर्धन आणि त्यांचे महत्त्व याबद्दल वेळोवेळी मार्गदर्शन केले.
बल्लाळेश्वर येथे किल्ले सरसगडाचे संवर्धन
By admin | Updated: March 2, 2017 00:39 IST