मालेगाव पश्चिम पट्ट्यातील काटवण परिसरात निमशेवडी, गरबड आदी गावांमधील ही परिस्थिती आहे. नेटवर्कच्या शोधात मैलोनमैल पायपीट करणारे गावकरी मात्र पुरते कंटाळले आहेत. गाव खेड्यातील परिस्थिती अवघड झाली आहे. कुणाला फोनवरून संवाद साधणे शक्य नाही तसेच ऑनलाईन शिक्षणाचे मात्र नाव मोठे लक्षण खोटे ठरत आहे. जिथे कॉलवर बोलायचे वांदे तिथे इंटरनेटसाठी नेटवर्क कुठून मिळणार? यामुळे येथील विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून वंचित आहेत. वर्ष दीड वर्षापासून शासनाच्या वतीने ऑनलाइन शिक्षणाचा दिंडोरा पिटण्यात येत असला तरी मालेगावसारख्या तालुक्यात अशी परिस्थिती असेल तर इतर ठिकाणी काय अवस्था असेल, याचा अंदाज येतो. निमशेवडी, गरबड गावाच्या आजूबाजूस असलेल्या वडणेर-खाकुर्डी व अजंग-वडेल गावांमधे नेटवर्क मिळते; मात्र निमशेवडी गावात कोणत्याही कोणत्याही कंपनीच्या सीमकार्डला नेटवर्क मिळत नाही. या परिसरात कोणत्याही दूरसंचार कंपनीचा टॉवर नसल्याने कोणतेही सीम घेतले तरी नेटवर्क मिळत नाही. यासाठी टॉवर उभारण्याची गरज असल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले. पंचवीसशे ते ३ हजारच्या आसपास लोकसंख्या असलेल्या निमशेवडी आजूबाजूच्या टिपे- मोरदर तसेच वाड्या -वस्तांच्या संपर्क या गावाशी येतो. बहुतांश नागरिक शेतात वाड्या-वस्त्यावर वास्तव्यास आहेत. रेंजच नसल्याने ना कोणाचा फोन येतो ना कुठले ऑनलाईन कामकाज यामुळे काही काम असल्यास हाताचे काम सोडून वडनेरसारख्या गावात तसेच मालेगावी धाव घ्यावी लागते. यामुळे वेळ आणि पैसा दोघेही वाया जात आहेत.
कोट....
आमच्या निमशेवडी गावात नेटवर्क उपलब्ध नसल्याने मोबाईल असूनही नसल्यासारखा आहे. कोणताही टॉवर नसल्याने रेंजसाठी भटकंती करावी लागते. यामुळे गावात टॉवर उभारण्याची गरज आहे.
- प्रकाश गरुड, उपसरपंच, निमशेवडी
कोट....
गावात रेंज नसल्याने शालेय विद्यार्थांना ऑनलाईन शिक्षणाला मुकावे लागत आहे तसेच जे काम मोबाईलच्या माध्यमातून होऊ शकते त्या कामासाठी १० ते १५ किलोमीटर अंतरावर हातातले काम सोडून जावे. यामुळे लवकरात लवकर टॉवर उभारावे.
- बाबाजी मसुळ, सदस्य, निमशेवडी