नाशिक : तिसऱ्या शाही पर्वणीनंतर साधुग्राममधील खालशांनी बस्तान गुंडाळण्यास सुरुवात केल्याने तपोवन सामसूम झाले आहे; मात्र त्र्यंबकला तिसरे शाहीस्नान शुक्रवारी असल्याने भाविकांची गर्दी कपिला संगमाजवळ वाढली आहे. त्र्यंबकला शाहीस्नानासाठी येणारे भाविक तपोवनातील लक्ष्मण मंदिरात दर्शनासाठी येत असल्याने त्याठिकाणी भाविकांचा ओघ कायम असल्याचे दिसून येते.तिसऱ्या शाही पर्वणीनंतर तपोवनात निम्म्यापेक्षा जास्त खालशे रवाना झाले आहेत. तसेच सेक्टर दोन व एकमध्ये बहुतांश खालशाचे मंडप व साहित्य आवरण्याचे काम करीत आहे. त्यामुळे खालशे साहित्य घेऊन रवाना झाल्याने त्याठिकाणी महापालिकेकडून बसविण्यात आलेल्या शौचालय व स्नानगृहाची पत्रे उरले आहेत. सेक्टर दोनमधील काही खालशामध्ये राम नामाचा गजर शुक्रवारपर्यंत सुरू राहणार आहे. त्र्यंबकच्या शाहीस्नानापर्यंत सदर खालशाचा मुक्काम आहे. परंतु त्र्यंबकचे शाहीस्नान झाल्यानंतर याठिकाणी संपूर्ण खालशे रिकामे होणार आहेत. भजनाचा कार्यक्रम मुक्कामी थांबलेल्या खालशामध्ये सुरू आहे. साधू-महंत शाहीस्नानानंतर रवाना झाल्याने त्यांचे भक्तगण कामगारांकडून सामान नियोजित स्थळी पोहचविण्याचे काम पार पाडत आहेत. (प्रतिनिधी)
कपिला संगमावर भाविकांची गर्दी
By admin | Updated: September 23, 2015 22:45 IST