नाशिक : तीन आठवड्यांपूर्वी झालेल्या सर्वसाधारण सभेतील ठरावाची नक्कल मिळत नसल्याने जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाची सुमारे दोन कोटी रुपयांची चारचाकी वाहन खरेदी रखडल्याचे वृत्त आहे. चार चकरा मारूनही नक्कल मिळत नसल्याने समाजकल्याण सभापती उषा बच्छाव यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या कामापुरता नक्कलसाठी संबंधित ठरावावर अध्यक्ष स्वाक्षरी करीत नसल्याचे कारण पुढे केले जात असल्याचे कळते.जिल्हा परिषदेची २९ जून रोजी सर्वसाधारण सभा होऊन त्या सभेत समाजकल्याण विभागाकडील दोन कोटींचा घरकुलाचा निधी चारचाकी वाहन खरेदीसाठी वर्ग करण्याचा ठराव संमत करण्यात आला होता. पुढे हा ठराव समाजकल्याण आयुक्तांना पाठविण्यात येऊन त्यांच्या मान्यतेनंतरच ही खरेदीची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यापूर्वीही समाजकल्याण विभागाचा दोन कोटींचा निधी घरकुलांसाठी राखीव ठेवलेला असताना समाजकल्याण आयुक्तांनी त्यास मान्यता न दिल्याने हा निधी अन्य योजनांवर खर्च करण्याची तयारी समाजकल्याण विभागाने केली होती. त्यानुसार अपंग व बेरोजगार युवकांना चारचाकी वाहन देऊन त्यातून रोजगार निर्मितीसाठी या दोन कोटींतून चारचाकी वाहन खरेदीचा ठराव २९ जूनच्या सर्वसाधारण बैठकीत घेण्यात आला होता.या ठरावाची कामापुरती का होईना नक्कल मिळावी, यासाठी समाजकल्याण सभापती उषा बच्छाव यांनी अध्यक्ष विजयश्री चुंभळे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सामान्य प्रशासन विभागाला कामापुरती नक्कल देण्याचे आदेश दिल्याचे सांगितले. त्यानंतर उषा बच्छाव यांनी सामान्य प्रशासन विभागाकडे याबाबत पाठपुरावा केला असता, नक्कलच्या ठरावांवर अध्यक्षांची स्वाक्षरी झाल्यानंतरच तो ठराव ग्राह्ण धरण्यात येईल, त्यासाठी अध्यक्षांची स्वाक्षरी होणे गरजेचे असल्याचे सांगितले होते. (प्रतिनिधी)
कोट्यवधींची वाहन खरेदी अडकली ‘नकलेत’
By admin | Updated: July 23, 2016 01:48 IST