नाशिकरोड : श्रीगणेशाच्या मुखवट्याचे अस्सल सोन्याचे दागिने व नाणे दाखवून ग्राहकांना १५ हजार रुपये तोळ्याप्रमाणे विक्री करीत असल्याचे सांगायचे; त्यानंतर पितळी धातुचे नाणे व दागिने ग्राहकांना माथी मारून त्यांना फसविण्याच्या तयारीत असलेल्या उत्तर प्रदेशमधील दोन इसमांसह एका महिलेला गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक ३ ने पकडले आहे. त्यांच्याकडून सोन्यासारखे दिसणारे पितळी धातुचे ७ किलो ३०० ग्रॅम वजनाचे खोटे दागिने, नाणे पोलिसांनी जप्त केले आहे. पोलीस निरीक्षक संजय सानप यांना जुना सायखेडा रोड अभिनव आदर्श शाळेजवळ दोन इसम व एक महिला पितळी धातुचे खोटे दागिने, नाणे सोन्याचे असल्याचे भासवून विकण्यास येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार शुक्रवारी सायंकाळी सायखेडा रोड येथील अभिनव आदर्श शाळेजवळ पोलिसांनी सापळा रचून बनावट गिऱ्हाईक पाठविले. उत्तर प्रदेश लखनऊ येथील संशयित गणेश गंगाराम प्रजापती, बालचंद धनिराम गुजराती, राधा राजू राय यांच्याकडे गेलेल्या गिऱ्हाईकास त्यांनी गणपतीच्या मुखवट्याच्या सोन्याचा दागिना दाखविला. तसेच गोल आकाराचे एका बाजूला व्हिक्टोरीया को इंडिया असे लिहिलेले व दुसऱ्या बाजूला व्हिक्टोरीयाचे चित्र छापलेले सोन्यासारखे दिसणारे पितळी धातुचे नाणे दाखविले. सोन्याचे दागिने व नाणे १५ हजार रुपये तोळा या दराने घेणे-देण्याचे निश्चित झाले. बनावट गिऱ्हाईकांच्या इशाऱ्यानंतर सापळा रचलेल्या पोलिसांनी तिघांना पकडून त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे साडेतीन किलो वजनाचे सोन्यासारखे दिसणारे पितळी धातुचे गणपतीचे मुखवटा असलेला दागिना, ३ किलो ८०० ग्रॅम वजनाचे खोटे नाणे असे एकूण ७ किलो ३०० ग्रॅम वजनाचे खोटे दागिने, नाणे आढळून आले. पोलिसांनी त्यांच्या खिशातील रोकड, मोबाइल व खोटे दागिने, नाणे विकण्यासाठी सव्वा ग्रॅम वजनाचा खऱ्या सोन्याचा गणपतीच्या मुखवट्याचा दागिने जप्त केला आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे खोटे दागिने, नाणे खरे असल्याचे भासवून होणारी फसवणूक टळली आहे. सदर कामगिरी सहायक पोलीस निरीक्षक गंगाधर देवडे, सुभाष गुंजाळ, मोहन देशमुख, विलास गुंजाळ, गंगाधर केदार, शंकर गडदे, राजेंद्र जाधव, ललिता अहेर आदिंनी यशस्वीपणे पार पाडली. (प्रतिनिधी)
गुन्हे शाखेच्या युनिट तीनची कारवाई : महिलेचाही समावेश
By admin | Updated: November 30, 2014 00:25 IST