नाशिक : अडीच महिन्यांपूर्वी कॉलेजरोडवरील सन्मित्र अपार्टमेंटमधील अनधिकृतपणे बांधलेले तीन मजले तोडण्याची कार्यवाही महापालिकेने केल्यानंतर आता सदर इमारतीचे बांधकाम व्यावसायिक स्ट्रफकॉन इंजिनिअर्सचे संचालक साहेबराव गंगाधर कदम व त्यांची पत्नी कल्पना कदम यांच्याविरुद्ध इमारतीतील रहिवाशाने दिलेल्या फिर्यादीनुसार गंगापूर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या दोघांनाही पोलीसांनी अटक केली आहे.गंगापूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी सन्मित्र अपार्टमेंटमधील रहिवासी संजीव भाऊसाहेब बारवकर व इतर सदस्यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे, सदर अपार्टमेंटचे बांधकाम व्यावसायिक साहेबराव गंगाधर कदम यांच्याकडून रहिवाशांनी १९९३ मध्ये साठेखत करून घेत फ्लॅट विकत घेतले होते. त्यानंतर फ्लॅटचे खरेदीखत करून देण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करूनही कदम यांनी खरेदीखत करून दिले नाही. साहेबराव कदम यांची कॉन्ट्रॅक्टर म्हणून जबाबदारी असतानाही सहकारी सोसायटीची नोंदणीची कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे इमारतीची जमीन व इमारत सोसायटीकडे हस्तांतरित होऊ शकलेली नाही. साहेबराव कदम व त्यांची पत्नी कल्पना कदम यांनी संगनमताने सरकारी कागदपत्रांची फेरफार करत इमारतीच्या जागेवर आयटी पार्क बांधण्यासाठी परवानगी मिळविण्याकरिता फेरफार केलेली कागदपत्रे सादर केली. तसेच इमारतीच्या मंजूर नकाशाप्रमाणे बांधकाम न करता त्यात अनधिकृतपणे जास्त मजल्यांचे बांधकाम करत फसवणूक केली असल्याचे नमूद करण्यात आले आहे. रहिवाशाच्या तक्रारीवरून पोलिसांनी कदम यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट्स रेग्युलेशन आॅफ प्रमोशन आॅफ कन्स्ट्रक्शन, सेल, मॅनेजमेंट अॅण्ड ट्रान्सफर अॅक्टनुसार नाशिक शहरात पहिल्यांदाच अशा प्रकारे बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, संशयीत कदम दाम्पत्यांस शनिवारी (दि.१३) जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता १५ आॅगस्टपर्यत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
By admin | Updated: August 14, 2016 02:22 IST