पंचवटी : येथील राममंदिर परिसरातील रामनाम आधाराश्रमाच्या मागील बाजूस असलेल्या पटांगणात रविवारी रात्रीच्या सुमारास गाय-वासरू विजेचा धक्का लागून मृत्युमुखी पडले. रविवारी दिवसभर सुरू असलेल्या पावसामुळे महापालिका पथदीपाचा वीजप्रवाह जमिनीत उतरल्याने ही जनावरे दगावली असल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले. रविवारी रात्री पाऊस सुरू झाल्याने तांबड्या रंगाची गाय व पांढऱ्या रंगाचे वासरू रामनाम आधार आश्रमाच्या मागील बाजूस असलेल्या पत्र्याच्या शेडनजीक पावसापासून बचाव करण्यासाठी आडोशाला उभे होते. जवळच असलेल्या महापालिकेच्या पथदीपचा वीजप्रवाह जमिनीत उतरल्याने या घटनेत गाय व तिच्या वासराचा मृत्यू झाला आहे. रविवारी रात्री घडलेल्या या घटनेनंतर मनपा विद्युत विभागाला कळविण्यात आले. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पथदीपाचा वीजप्रवाह खंडित केला. सोमवारी सकाळपर्यंत ही मृत पावलेली जनावरे तेथेच पडून होती. परिसरातील रहिवासी केशव परदेशी यांच्या मालकीची ही जनावरे असल्याचे परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी सांगितले. (वार्ताहर)
विजेच्या धक्क्याने गाय-वासराचा मृत्यू
By admin | Updated: July 5, 2016 00:26 IST