लोकमत न्यूज नेटवर्क
देवगांव : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगांव परिसरामध्ये नागरिकांना कोविड-१९ महामारीच्या प्रतिबंधात्मक लसीच्या तुटवड्यामुळे लसीकरणाला ब्रेक लागला असून दुसऱ्या लसीच्या डोसची प्रतीक्षा नागरिक करीत आहेत. पहिला डोस घेऊन नागरिकांना पाच महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतरही दुसऱ्या डोसचे लसीकरण करण्यात आले नसून लस शिल्लक नसल्याने मोहीम लांबत आहे. त्यामुळे पहिल्या डोसचे लसीकरण केलेल्या नागरिकांना भीती वाटत असून लसीच्या दुसऱ्या डोसची मागणी देवगांव परिसरातील नागरिक करीत आहेत.
देवगांव लसीकरण केंद्रात मार्च महिन्यामध्ये लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी देवगांव परिसरातील नागरिकांनी प्रतिसाद देत लसीकरण केले होते. मात्र, त्यानंतर लसीकरण केलेल्या नागरिकांना ८५ दिवसांचा कालावधी उलटूनही दुसऱ्या डोसचे लसीकरण झाले नसल्याने देवगांव परिसरातील नागरिक चिंताग्रस्त झाले असून, लसीकरण सत्राचे आयोजन करून लसीचा दुसरा डोस उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
सध्या देशात लसीकरणाचा ५० कोटींचा टप्पा पार केला आहे. मात्र ग्रामीण भागात प्रतीक्षाच करावी लागत असून नागरिक लसीकरणापासून वंचित राहत आहेत. सुरुवातीच्या कालावधीमध्ये आदिवासी व ग्रामीण भागात लसीकरणाबाबत भीती व गैरसमज पसरले होते. मात्र, लसीकरणाच्या जनजागृतीने नागरिक स्वतःहून पुढाकार घेत आहेत.
परंतु, पहिल्या लसीच्या डोसनंतर ग्रामीण भागातील नागरिक वंचित असून पहिल्या व दुसऱ्या डोसमधील अंतर मोठ्या फरकाने वाढल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. कोरोनाचा ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढून अनेक रुग्णांना जीव गमवावा लागला.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने तर कहरच करत ग्रामीण भागातील परिस्थिती चिंताजनक बनली होती. त्यामुळे आरोग्य विभागाने कंबर कसून लसीकरण सत्राचे मोठ्या प्रमाणात आयोजन करून जास्तीत जास्त लसीकरणावर भर दिला. मात्र, आदिवासी, ग्रामीण भागात लसीकरणाबाबत अफवा आणि भीतीपोटी नागरिकांचा लसीकरणास अल्प प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. परंतु, ज्या नागरिकांनी पहिल्या लसीची मात्रा पूर्ण केली आहे अशा नागरिकांना दुसरी मात्रा आवश्यक असल्याने लसीकरणाची मागणी केली जात आहे.
काही पहिल्या डोसच्याच प्रतीक्षेत...
ग्रामीण भागातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अनेक जण मोठ्या प्रमाणात बाधित झाले होते. परंतु, प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर कोरोनावर मात केलेल्या नागरिकांना अजूनही पहिल्या लसीच्या डोसची प्रतीक्षा लागली आहे. कोविडमुक्त होऊन तीन महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला असून नागरिकांकडून लसीकरण सत्राचे आयोजन करण्याची मागणी होऊ लागली आहे.
कोट...
लस शिल्लक नसल्याने बहुतेक ठिकाणी लसीकरण मोहीम ठप्पच आहे. नागरिकांनी घाबरू नये. लस उपलब्ध झाल्यानंतर त्वरित लसीकरण करण्यात येईल. ज्या नागरिकांना लसीकरण करायचे असेल अशा लोकांनी त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयात जाऊन लसीकरण करून घ्यावे.
- डॉ. रेखा सोनावणे, आरोग्य अधिकारी, अंजनेरी कोविड सेंटर.
देवगांव लसीकरण केंद्रात पहिल्या डोससाठी लसीकरण झाल्यानंतर दुसऱ्या डोससाठीचे लसीकरण लांबले आहे. तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन ग्रामीण भागात लसीकरण तत्काळ करण्यात यावे.
- संतोष दोंदे, देवगांव.