नाशिक : मकरसंक्रांतीचा सण अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपला असून, पतंगप्रेमींची मांजा तसेच पतंग खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी होऊ लागली आहे. अनेकविध आकारांचे आणि विविध रंगसंगतीचे पतंग तसेच वेगवेगळ्या प्रकारचा मांजा शहरातील बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल झाला आहे. मकरसंक्रांतीला अवघे काही दिवस शिल्लक असताना पोलीस प्रशासनाकडून नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या दुकानदारांवर तसेच नायलॉन मांजा खरेदी करणाऱ्या ग्राहकांवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शहरातून नायलॉन मांजा हद्दपार व्हावा यासाठी पोलिसांना धडक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. शहरातील पतंग विक्रेत्यांनी एकत्र येत नायलॉन मांजा विक्री विरोधात एकजूट केली असली तरी अनेक ग्राहकांकडूनच नायलॉन मांजाची मागणी होत असल्याचे पतंग विक्रेत्यांनी सांगितले. प्रशासनाने नायलॉन मांजावर कारवाई करताना गणवेश परिधान न करता दुकानांना भेटी देण्याचे आवाहन करण्यात आले आहे, तसेच एखाद्या दुकानदाराच्या चुकीमुळे सगळ्याच विक्रेत्यांना चौकशीसाठी सामोरे जावे लागते हे चित्र थांबायला हवे, असेही अनेक पतंग विक्रेत्यांनी यावेळी सांगितले. पतंग उडवणाऱ्यांमध्ये युवकांचे आणि विद्यार्थ्यांचे प्रमाण जास्त असल्याने विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालय आणि शाळांमधून समुपदेशन करायला हवे, तसेच पालकांनी आपला पाल्य काय खरेदी करतोय याबाबत दक्ष असणे, शहरात मांजा दाखल होत असताना तो रोखणे, नायलॉन मांजा बनविणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करणे असे विविध मुद्दे पतंग विक्रेत्यांनी मांडले. नायलॉन मांजाच्या विक्री बंदीमुळे पक्षी आणि नागरिकांच्या अपघातांना काही प्रमाणात आळा बसणे शक्य होणार आहे. (प्रतिनिधी)
पतंगप्रेमींचे समुपदेशन गरजेचे
By admin | Updated: January 12, 2017 00:38 IST