नाशिक : गोदावरी नदीकाठी आसाराम बापू पुलाजवळ साकारण्यात आलेल्या गोदापार्कला पुराची झळ पोहोचून नुकसान झाल्यानंतर त्याची दुरुस्तीची जबाबदारी रिलायन्स फाउंडेशनचीच असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. अद्याप गोदापार्कचा ताबा महापालिकेला मिळाला नसल्याचेही सूत्रांनी सांगितले.मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आसारामबापू पुलानजीक सुमारे ६०० मीटरचा गोदापार्क रिलायन्स उद्योग समूहाच्या रिलायन्स फाउंडेशनच्या माध्यमातून साकारला जात आहे. त्यात प्रामुख्याने संगीत कारंजा, नौकाविहार, चिल्ड्रेन पार्क, नाना-नानी पार्क, योगासन केंद्र, लेझर शो, रोप-वे, खुला रंगमंच, वॉक-वे, फूट स्टेप ब्रिज आदि सुविधांचा समावेश असणार आहे. सद्यस्थितीत पायऱ्या, हिरवळ, विद्युत दीप आदि प्राथमिक कामे करण्यात आलेली आहे, परंतु गेल्या रविवारी (दि. १०) झालेल्या जोरदार पावसामुळे गोदावरी नदीला पूर येऊन त्यात गोदापार्कचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी जमिनीचा भाग खचला आहे तर हिरवळ, पायऱ्यांवरील फरशा वाहून गेल्या आहेत. त्यामुळे महापालिकेने गोदापार्ककडे जाणारा रस्ता बंद केला होता. दरम्यान, गोदापार्कच्या दुरुस्तीची जबाबदारी रिलायन्स फाउंडेशनकडेच असून त्यांनी अद्याप महापालिकेच्या ताब्यात प्रकल्प दिला नसल्याचे महापालिकेच्या सूत्रांनी म्हटले आहे.
रिलायन्स फाउंडेशनच करणार गोदापार्कची दुरुस्ती
By admin | Updated: July 16, 2016 00:24 IST