नाशिक : गृहोपयोगी वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या कंपनीत गुंतविलेले भांडवल व त्यावरील कमिशन मिळत नसल्याने ते वसूल करण्यासाठी कंपनीतील कमिशन एजंटला चर्चेसाठी नाशकात बोलावून त्याचे अपहरण करून त्याच्या वडिलांकडून तीन कोटींची खंडणी मागणाऱ्या तिघा संशयितांच्या तावडीतून अपहृत एजंटची भद्रकाली पोलिसांनी सुखरूप सुटका केल्यानंतर यातील फरार धीरज अशोक शेळके व रवि कावळे या दोन संशयितांचा शोध सुरू असून, यातील शेळके हा महापालिका नगरसेवकाचा पुत्र असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे़ (पान २ वर)गुजरातमधील मुकेश गणेशभाई कुकडीया यांचा मुलगा दीपक कुकडीया हा जिग्नेश पानसरीया यांच्या गुजरातमधील विनटेक कंपनीत कमिशन एजंट म्हणून काम करतो़ दीपक याच्याशी ओळख झालेले संशयित ललित भानुभाई पटेल, हितेश अमृतलाल पटेल, संदीप गणेश पटेल (रा़ शंकरनगर, गंगापूररोड, नाशिक) यांनी कंपनीचे नाशिक शहरात गृहोपयोगी साहित्याचे दुकान सुरू करण्यासाठी नॉनरिफंडेबल तत्त्वावर दीड कोटी रुपयांची गुंतवणूक केली़ या गुंतवणुकीच्या बदल्यात संशयितांना कंपनीच्या वार्षिक नफ्यातून पाच टक्के कमिशन दिले जात होते़ कंपनीने तीन महिन्यांपासून संशयितांना कमिशन वा गुंतविलेली रक्कम परत देत नसल्यामुळे चर्चेच्या बहाण्याने त्यांनी एजंट दीपक कुकडीया याला नाशकात बोलावून त्याचे अपहरण केले़ तसेच तीन कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करून पैसे न दिल्यास जिवे मारण्याची धमकी दिली़ भद्रकाली पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी अपहृत दीपकची सुखरूप सुटका करून संशयित ललित पटेल, हितेश पटेल, संदीप पटेल या तिघांना अटक केली़ दरम्यान, या अपहरणाच्या गुन्ह्णातील फरार संशयित धिरज शेळके व रवि कावळे या दोघांपैकी शेळके हा माजी प्रभाग सभापती व नुकत्याच मनसेतून शिवसेनेत प्रवेश केलेल्या नगरसेवकाचा पुत्र असल्याची माहिती भद्रकाली पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने ‘लोकमत’शी बोलताना दिली़ (प्रतिनिधी)
खंडणीतील संशयितांमध्ये नगरसेवकपुत्र
By admin | Updated: August 15, 2016 00:05 IST