महापालिकेच्या स्थायी समितीची बैठक सभापती गणेश गिते यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि.१८) पार पडली. यावेळी शिवसेनेचे सुधाकर बडगुजर यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. सर्व्हे नंबर २९५ वरील आरक्षण रेल्वेसाठी असून सिन्नर फाटा येथील हा आरक्षित भूखंड भूसंपादनाव्दारे ताब्यात घेण्याची कायदेशीर जबाबदारी रेल्वेचीच असताना नाशिक महापालिकेने भूसंपादन केले. त्यातही सिन्नर फाटा येथील भूखंडला बिटको कॉलेजलगत असलेले रेडिरेकनरचे दर लावून मोबदला दिला असा आरोप बडगुजर यांनी केला होता. त्यानंतर प्रशासन आणि नगरसेवक यांचा समावेश असलेली एक चौकशी समिती नियुक्त करण्यात अली होती. तर याच प्रकरणात प्रशासनानेदेखील नगरविकास खात्याच्या आदेशावरून एक समिती नियुक्त केली होती. मात्र, प्रशासनाने नगरसेवक सदस्य असलेल्या चौकशी समितीला फाटा देऊन परस्पर चौकशी केली असून त्याचा अहवाल लवकरच स्थायी समितीत मांडण्यात येईल असे अतिरतक्त आयुक्त सुरेश खाडे यांच्या विधानातून स्पष्ट झाले. त्यामुळे सभापती गणेश गिते यांनी स्थायी समितीच्या सदस्यांचा समावेश असलेल्या चाैकशी समितीचा अहवाल अंतिम करण्यापूर्वी बैठक बोलवावी, अशी मागणी केली.
इन्फो..
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहाच्या साफसफाईचा ठेका विनानिविदा करून घेतल्या कामाचा ५६ लाख १५ हजार रुपयांचा मोबदला देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने कोणतीही चर्चा न करताच मान्य केला. यापूर्वी महासभेवर सहा वेळा हा विषय तहकूब करून वादळी चर्चा झाली होती. मात्र, महासभेत हा विषय परस्पर मंजूर दाखवून स्थायी समितीवर अंतिम मान्यतेसाठी आल्यानंतर गेल्यावेळी सुधाकर बडगुजर यांनी आक्षेप घेतला होता. मात्र, बुधवारी (दि.१८) कोणतीही चर्चा न करताच हा विषय परस्पर मंजूर करण्यात आला. अशाच प्रकारे विकासकामे,भूसंपादनाचा मेाबदला देणे असे सर्व विषय विनाचर्चा मंजूर करण्यात आले.