सिडको : येथील अंबड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार भाऊसाहेब यशवंत सोनवणे यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच गळफास घेऊन आत्महत्त्या केल्याचा धक्कादायक प्रकार आज पहाटेच्या सुमारास उघडकीस आला. या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली असून, सोनवणे यांच्या खिशात चिठ्ठी आढळून आल्याने पोलीस त्या दिशेने तपास करीत आहेत. सिडकोतील राजरत्न भागात राहणारे पोलीस हवालदार भाऊसाहेब यशवंत सोनवणे (४७) हे गेल्या दोन वर्षांपासून अंबड पोलीस ठाण्यात गोपनीय विभागात कार्यरत होते. रविवारी नेहमीप्रमाणे सोनवणे हे सकाळी नऊ वाजेच्या सुमारास कामावर हजर झाले. यानंतर दिवसभर काम केल्यानंतर रात्री घरी परतले नसल्याने घरातील मंडळींनी पोलीस ठाण्यात फोन करून विचारपूस केली असता पोलिसांनी, ते कामकाज करीत असलेल्या ठिकाणी नसून कामानिमित्त बाहेर गेले असावे, असे सांगितले. यानंतर घरातील मंडळींसह अनेकांनी त्यांना फोन केले, परंतु त्यांनी कोणाचेही फोन उचलले नाहीत. पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास नाईट ड्यूटी करणारे जमादार कैलास बच्छाव हे पोलीस ठाण्याच्या मागील बाजूकडून जात असताना त्यांना सदर बॅरेकमधून फोन वाजत असल्याचा आवाज आला. यामुळे बच्छाव यांनी बॅरेकचा दरवाजा उघडून पाहिला असता पोलीस हवालदार भाऊसाहेब सोनवणे यांनी नायलॉन दोरीने गळफास घेतला असल्याचे आढळून आले. यानंतर बच्छाव यांनी वरिष्ठांना याबाबत माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त विजय पाटील, श्रीकांत धिवरे, सहायक पोलीस आयुक्त अतुल झेंडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, दिनेश बर्डेकर आदिंनी पोलीस ठाण्यात येऊन घटनेची माहिती घेतली. मयत भाऊसाहेब सोनवणे यांच्या पश्चात पत्नी, दोेन मुली, जावई असा परिवार आहे. सोनवणे हे खेळाडू म्हणूनही परिचित होते. त्यांनी पोलीस दलात राहून खेळात अनेक पारितोषिके मिळविली असून त्यांना क्रिकेट, कुस्ती, कबड्डी, धावणे या खेळांमध्ये अधिक रस होता. मयत सोनवणे हे मूळचे मालेगाव तालुक्यातील आघार (बु) येथील रहिवासी असून, त्यांचा अंत्यविधी त्यांच्या मूळगावी करण्यात आला. अंत्ययात्रेप्रसंगी पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचारी, नातेवाईक व मित्रपरिवार उपस्थित होते. (वार्ताहर)
पोलीस ठाणे आवारातच हवालदाराची आत्महत्त्या
By admin | Updated: August 2, 2016 02:07 IST