नाशिक : राज्यात सत्तेत असूनही आंदोलने करणाऱ्या शिवसेनेचे शहरात वातावरण दिसते आहे, तसेच मनसेबरोबर गेल्याने कॉँग्रेस पक्षाचे नुकसान झाले आहेत, अशा प्रकारची विभिन्न मते मांडताना कॉँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात स्थानिक पदाधिकारी आणि नगरसेवकांनी नेत्यांच्या वागणुकीबाबत तक्रारींचा सूर लावला. लढण्यासाठी कार्यकर्ते आणि उमेदवारीसाठी मात्र वशिलेबाजी असे प्रकार गेल्या निवडणुकीत झाल्याने पक्षाचे नुकसान झाल्याचा आरोपही करण्यात आला.आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हॉटेल ग्रीन व्ह्यू येथे आयोजित बैठकीत स्थानिक कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह अन्य सर्वच नेत्यांच्या पुढ्यात मन मोकळे केले. नगरसेवक राहुल दिवे यांनी शहरात जनसामान्यांच्या विषयावर शिवसेना सत्तेत असूनही आक्रमकपणे आंदोलने करीत असून, त्यामुळे शहरात शिवसेनेचे वातावरण निर्माण झाल्याचे सांगितले. राष्ट्रवादीतील ‘सुपारी मॅन’ असलेल्यांमुळे पालिकेत कॉँग्रेसची फरफट झाली असल्याचे त्यांनी सांगितले, तर प्रदेश प्रवक्त्या डॉ. हेमलता पाटील यांनी मनसेबरोबर जाण्यास आपला सुरुवातीपासूनच विरोध होता. आज मनसेविषयी जनमत वाईट असून, मनसेबरोबर कॉँग्रेस गेल्याने कॉँग्रेसच्या प्रतिमेलाही धक्का बसला असल्याचे त्या म्हणाल्या.
मनसेशी युती केल्याने कॉँग्रेसचे नुकसान
By admin | Updated: August 1, 2016 00:41 IST