नाशिक : गेल्या पंधरा वर्षांपासून असलेली आघाडी तुटल्यानंतर स्वबळावर लढताना कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षासाठी यंदाची विधानसभा निवडणूक सत्त्वपरीक्षा पाहणारी ठरणार असून, आपली पारंपरिक व्होट बॅँक टिकवून ठेवण्यासाठी दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. जिल्ह्यात कॉँग्रेस-राष्ट्रवादीने बव्हंशी मतदारसंघांत मातब्बर उमेदवार दिल्याने निवडणुकीत रंगत वाढली आहे. राष्ट्रवादीने पंधरापैकी सहा उमेदवारांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे, तर कॉँग्रेसने इगतपुरीत विद्यमान आमदार निर्मला गावित वगळता अन्य मतदारसंघांत नवीन चेहरे दिले आहेत. सन २००९ च्या विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने पंधरापैकी पाच जागांवर विजय संपादन केला होता. त्यावेळी राष्ट्रवादीने नऊ, तर कॉँग्रेसने सहा जागा लढवल्या होत्या. राष्ट्रवादीने तीन जागांवर विजय मिळवत ४०.१४ टक्के मते मिळविली होती, तर कॉँग्रेसने सहा जागा लढवताना दोन जागांवर विजय संपादन करत २६.४४ टक्के इतकी मते मिळविली होती. गत निवडणुकीत राष्ट्रवादीचे सहा ठिकाणी उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते, तर कॉँग्रेसचे दोन ठिकाणी उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते. स्वबळावर लढण्याचा नारा दिला गेल्यानंतर दोन्ही पक्षांकडून इच्छुकांच्या अपेक्षा उंचावल्या आणि गेल्या पंधरा वर्षांपासून काही उमेदवारांचा राजकीय वनवासही त्यानिमित्ताने संपुष्टात आला. कॉँग्रेसने यापूर्वी त्यांच्या वाट्याला असलेल्या सहा पैकी पाच मतदारसंघात नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. त्यात मालेगाव मध्यमधून शेख रशिद यांचे सुपुत्र शेख आसिफ शेख रशीद, नाशिक पूर्वमधून नगरसेवक उद्धव निमसे, मध्यमधून नगरसेवक शाहू खैरे यांना संधी मिळाली आहे. सिन्नरमधून विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे यांनी ऐनवेळी पक्षाला रामराम ठोकत भाजपात प्रवेश केल्याने कॉँग्रेसने याठिकाणी संपत काळे यांना उमेदवारी दिली आहे. यापूर्वी राष्ट्रवादीच्या कोट्यात असलेल्या जागांवर कॉँग्रेसने नांदगाव- अनिल अहेर, चांदवड- शिरीष कोतवाल, निफाड- राजेंद्र मोगल, दिंडोरी- रामदास चारोस्कर आणि नाशिक पश्चिम- दशरथ पाटील याठिकाणी मातब्बर उमेदवार देत चुरस निर्माण केली आहे, तर राष्ट्रवादीने कॉँग्रेसच्या वाट्याला असलेल्या जागांवर मालेगाव मध्य- मौलाना मुफ्ती अहमद, बागलाण- दीपिका संजय चव्हाण, सिन्नर- शुभांगी गर्जे, नाशिक मध्य- विनायक खैरे आणि इगतपुरी- हिरामण खोसकर यांना उमेदवारी दिली आहे. स्वबळावर होणाऱ्या लढतीमुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला असून, सेना-भाजपाच्या उमेदवारांपुढे कडवे आव्हान उभे ठाकले गेले आहे. (प्रतिनिधी)